मौदा,
chokhalya to bring rain मंडप सजला, बँडबाज्यासह वर्हाडी आले आणि लग्न घटिका समीप येताच सर्वत्र उत्साह संचारला. हा लग्न सोहळा खास असल्याने या सोहळ्याला खास पाहुण्याला आमंत्रित करण्यात आले. हा पाहुणा आहे वरुण राजा. होय पावसाला आमंत्रण देण्यासाठी बाहुला-बाहुलीचं लग्न लावण्यात आले. अरोली जवळील चोखाळा येथे हा आगळा-वेगळा विवाह सोहळा पार पाडला. वरूण राजाला पावसासाठी साकडे घालून पावसाची प्रतीक्षा संपवावी म्हणून बाहुला-बाहुलीचा स्वयंवर आयोजित करण्यात आला.

लग्न मंडप हिरव्यागार झाडांच्या फांद्यांनी सजला. सायंकाळ झाली अन् नवरदेव रुपी बाहुला लग्न मंडपात येण्यासाठी जानवशावरून निघाला. नवरदेव रुपी बाहुल्यासोबत एक दोन नव्हे चक्क १०० हून अधिक वऱ्हाडी वरातीत सामील झाले. वरातीत वऱ्हाडी बेधुंद नाचू लागले. वाजत गाजत वरात सगुण घागर घेऊन लग्न मंडपात पोहचली. तर बाहुली नटून थटून नवरीच्या रूपात मंडपात आसनस्थ झाली. चक्क मंगलाष्टके झाली आणि बाहुला-बाहुलीचा लग्न सोहळा पार पडला. नंतर वर्हाड्यांसाठी स्वादिष्ट भोजनाची सोय केली होती. सर्वांनी एकत्रित येऊन मस्त मजेत जेवण केले. आतामात्र या सोहळ्यानंतर सगळ्यांना पावसाची चातकासारखी प्रतीक्षा आहे.