निवडणूक कामावर गैरहजर : नऊ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
absence-from-election-duty : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेतील नियुक्ती आदेशाचे पालन न करता निवडणूक कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी सदर पोलिसांनी ९ शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २२३ तसेच लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम ३२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
 
 

j 
 
 
या प्रकरणी दत्तात्रय जनार्दन धात्रक (५६), नायब तहसीलदार तथा ५३ नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये प्रवीण घोडके (सहाय्यक शिक्षक, घोडके प्रबोधिनी प्राथमिक शाळा), लता मेश्राम, सुवर्णा भस्मे, शंकर चांदेकर (जवाहर नाईट स्कूल, सिताबर्डी), सचिन सुदाम राठोड, स्वाती जयंत महाजन (विदर्भ बुनियादी स्कूल), सुनिता मोहन मते (हेमंत जकाते विद्यालय, हुडकेश्वर), कल्याणी मारगोडे (आशा वर्कर, बाबुळखेडा) आणि पूजा मेश्राम (टॅक्स कलेक्टर, नागपूर महानगरपालिका) यांचा समावेश आहे.
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षणाचे काम सुरू असून संबंधित कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यासंदर्भात मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या आदेशानुसार त्यांना निवडणूक कर्तव्यावर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी नियुक्ती आदेशाचे पालन न करता निवडणूक कामावर हजेरी लावली नाही. तसेच गैरहजेरीबाबत कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरणही सादर केले नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया ही अत्यावश्यक आणि कायद्याने बंधनकारक असतानाही कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे सदर पोलिसांनी सर्व नऊ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम ३२ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.