नियमबाह्य घेतला घरकूलचा लाभ

दोषींवर कारवाई करा अन्यथा आत्मदहन

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
मोझरी (शेकापूर), 
housing-scheme : जागा नावावर नसतानाही बनावट कागदपत्र तयार करून महिला ग्रा. पं. सदस्य संचाली पंडित यांनी पती अमोल पंडित यांच्या नावाने घरकुलाचा लाभ उचलला. यासंदर्भात पुराव्यानिशी तक्रार करूनही गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई केली नाही. याप्रकरणी कारवाई न झाल्यास ३० जुलै रोजी आत्मदहन करण्याचा इशारा बाबाराव पंडित यांनी निवेदनातून दिला.
 

tb 
 
 
 
हिंगणघाट पं. स. अंतर्गत येणाऱ्या नांदगाव-कानगाव येथील रहिवासी बाबाराव पंडित यांचे गावात स्लॅबचे पक्के मकान आहे. सदर मकान व जागा प्रभाग २ मध्ये असून घर क्रमांक ४ आहे. ग्रा. पं.च्या रेकॉर्डनुसार ३५ बाय ३५ अशी १२२५ चौ. फूट जागा आहे. त्यांना दोन मुले असून विभक्त कुटुंब आहे. त्यांचा मुलगा अमोल पंडित यांच्या नावाने कुठलीही जागा करून दिली नसताना त्यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि रोजगार सेवकाला हाताशी धरून बनावट कागदपत्र तयार करून त्या जागेवर सन २०२४-२५ मध्ये घरकुल योजनेअंतर्गत पक्के घर बांधले. एवढेच नव्हे तर त्याने रोजगार हमी योजनेद्वारे २८ हजार रुपयांची उचल केल्याचेही उघडकीस आले. याबाबत बाबाराव पंडित यांनी सन २०२४ व मार्च २०२५ रोजी सरपंच, ग्रामसेवक आणि रोजगार सेवकांना माहिती दिली. परंतु, संबंधितांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. उलट मजुरांच्या नावाने शौचालयाचे व घरच्या बांधकामाचे पैसे काढून दिल्याचा आरोप बाबाराव पंडित यांनी केला. तसेच ग्रा.पं. सदस्य संचाली अमोल पंडित यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून पतीच्या नावे जागा नसताना सुद्धा पैसे हडप करण्याच्या उद्देशाने आपल्याच नावाने मस्टरद्वारे ९३६० रुपये काढले. सोबतच आणखी दुसऱ्याच्या नावाने देखील पैशांची उचल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणात दोषी असलेले अमोल पंडित, सचिव रमेश जाधव, सरपंच ताई खासरे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सूरज तिमांडे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सविता पाटील, रोजगार सेवक उमेश पाटील, ग्रापं सदस्य संचाली पंडित, चेतना कामडी यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी. अन्यथा, ३० जुलै रोजी जि. प. समोर आत्मदहन करण्याचा इशारा बाबाराव पंडित यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.
नांदगाव (कानगाव) येथील घरकूल घोटाळ्यातील लाभार्थ्याला ग्रामपंचायत कार्यालयाकडून जागेचा नमुना आठ किंवा इतर कुठलेही कागदपत्र देण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकरणाशी माझा किंवा ग्रा.पं.चा कुठलाही संबंध येत नाही, अशी प्रतिक्रिया नांदगावच्या सरपंच ताईबाई खासरे यांनी दिली.