बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात तीन आयपीएस अधिकारी निर्दोष

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
बंगळुरू,
Bengaluru stampede incident रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या आयपीएल विजेतेपदानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माजी शहर पोलीस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह तीन आयपीएस अधिकाऱ्यांविरोधातील विभागीय चौकशी बंद करण्यात आली असून, जून २०२५ मधील या दुर्घटनेप्रकरणी त्यांना निर्दोष घोषित करण्यात आले आहे.४ जून २०२५ रोजी आरसीबीच्या विजय सोहळ्यानिमित्त चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणावर क्रिकेटप्रेमी जमले होते. प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ५० हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त बी. दयानंद, अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार विकास, तत्कालीन पोलीस उपायुक्त (मध्य विभाग) शेखर तसेच एका सहाय्यक पोलीस आयुक्त आणि एका पोलीस निरीक्षकाला निलंबित केले होते.
 
 

movmernt 
 
मंगळवारी राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात संबंधित अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण आणि प्रशासकीय विभागाचा अहवाल तपासल्यानंतर त्यांच्यावरील विभागीय चौकशी समाप्त करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. तसेच निलंबित सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक यांच्या प्रकरणातही लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, या प्रकरणाचा अहवाल कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात सादर केला असून, त्यामध्ये चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या दुर्घटनेची जबाबदारी आरसीबी व्यवस्थापनावर टाकण्यात आली आहे. अहवालानुसार, कार्यक्रमासाठी आवश्यक औपचारिक परवानगी घेण्यात आली नव्हती. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रमाचे नियोजन सुरू ठेवण्यात आले. कार्यक्रमस्थळी अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी जमली होती. शेवटच्या क्षणी प्रवेश पास देण्याच्या प्रक्रियेमुळे गोंधळ वाढला, तर गर्दीचे नियोजन आणि नियंत्रणही अपुरे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.