मानोरा,
manora accident, लेह येथे झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या रिसोड येथील अॅड. कुणाल चोपडे यांच्या अंत्यविधीस उपस्थित राहून परत येत असलेल्या कारचा आज, १५ जुलै रोजी पहाटे मानोरा शहराजवळ भिषण अपघात झाला. या अपघात कारमधील ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्रस येथील दीपक फिरके यांच्यासह इतर तिघे जण रिसोड येथे अॅड. कुणाल चोपडे यांच्या अंत्यविधीस उपस्थित राहण्यासाठी गेले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर ते एमएच२९ व्ही १९१९ या क्रमांकाच्या कारने दिग्रसकडे परत निघाले होते. आज पहाटे ३.३० वाजता दरम्यान मानोरा शहरातील सृष्टी गार्डनसमोर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने डिव्हायडरला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचे मोठे नुकसान झाले आणि वाहनातील चारही जण जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच मानोरा येथील शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना त्वरित बाहेर काढून मानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सर्व जखमींना दिग्रस येथील रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मानोरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.