बुलढाणा,
mangrul-navghare : चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत आणि काही शिक्षकांच्या कथित अकार्यक्षम कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या आरोपावरून शाळा समिती, शाळा सुधार समिती व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने दि. १३ जुलै पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल घेत नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय गायकवाड यांनी दि. १५ जुलै रोजी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.

उपोषणकर्त्यांनी यावेळी आपल्या प्रमुख मागण्या मांडताना जिल्हा परिषद हायस्कूलमधील अकार्यक्षम, कामचुकार व शिक्षकी पेशाशी अप्रामाणिक वर्तन करणार्या पाच शिक्षकांवर कठोर कारवाई करून त्यांची इतरत्र बदली करण्यात यावी, अशी मागणी केली. त्याचबरोबर शाळेत विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंगरूळ नवघरे येथे अमोल आंभोरे व दिनेश पवार यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा महत्त्वाच्या मागण्याही त्यांनी प्रशासनासमोर ठेवल्या.
या मागण्यांची गंभीरता लक्षात घेऊन आ. संजय गायकवाड यांनी तात्काळ बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात तसेच शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या प्रशासनापुढे ठामपणे मांडत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने तातडीने योग्य निर्णय घेण्याची विनंती केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत, नियमांनुसार सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच योग्य तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनीही शिक्षणाशी संबंधित विषयांवर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी भूमिका व्यक्त केली.
प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर युवानेते मृत्युंजय गायकवाड तसेच अंकुशराव पडघान, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन यांच्या हस्ते नितीन तांबट, श्याम आढाव, मनोहर शिंदे,रामेश्वर धमक, स्वप्निल कठाळे या उपोषणकर्त्यांना सरबत पाजून आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव मोरे, संतोषराव वाकडे, सुधाकर ढमक, पिंटू गायकवाड, राम शेळके, सहकार सोसायटी अध्यक्ष भास्कर ढमक, राजू पाटील अंभोरे, निखिल अंभोरे, विजय जाधव, रमेश येळवंडे, प्रल्हाद जोशी, कैलास काळे,श्री. ज्ञानेश्वर खांडवे,चिखली उपतालुकाप्रमुख नितीन शिंदे, मनीष लहाने, राहुल ढोणे, कुणाल बोरकर, पार्थ पाटील, आशिष जवंजाळ,यांच्यासह शाळा समिती व शाळा सुधार समितीचे पदाधिकारी, समस्त ग्रामस्थ तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.