पुरी,
Conflict over date of Jagannath Rath Yatra भगवान श्रीजगन्नाथांच्या रथयात्रेच्या आयोजनाच्या तारखांवरून पुरीतील श्रीजगन्नाथ मंदिर प्रशासन (एसजेटीए) आणि इस्कॉन यांच्यातील वाद अधिकच तीव्र झाला आहे. रथयात्रा कोणत्याही दिवशी आयोजित करता येते, हा इस्कॉनचा दावा मंदिर प्रशासनाने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला असून, अशा प्रकारचे दावे धर्मग्रंथांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. एसजेटीएने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात, १२ जुलै रोजी इस्कॉनच्या नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संपर्क कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनावर आक्षेप घेतला आहे. या प्रसिद्धीपत्रकात तथ्यहीन माहिती देत भक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप मंदिर प्रशासनाने केला आहे.
मंदिर प्रशासनाच्या मते, भारताबाहेर वर्षभरातील वेगवेगळ्या तारखांना रथयात्रा आणि भगवान जगन्नाथांशी संबंधित उत्सव साजरे करणे हे शास्त्रसंगत नसून पारंपरिक धार्मिक नियमांच्या विरोधात आहे. त्यामुळे इस्कॉनने रथयात्रा धर्मग्रंथांनुसारच आयोजित केली जाते, हा दावा चुकीचा असल्याचे एसजेटीएने स्पष्ट केले.या वादावर तोडगा काढण्यासाठी २० मार्च २०२५ रोजी भुवनेश्वर येथे एसजेटीए आणि इस्कॉनच्या विद्वानांची संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत इस्कॉनच्या प्रतिनिधींनी विविध धर्मग्रंथांचा आधार देत परदेशात वेगवेगळ्या तारखांना रथयात्रा काढण्याची भूमिका मांडली. मात्र, पुरी मंदिर प्रशासनाच्या विद्वानांनी धर्मग्रंथ आणि पुराणांचा दाखला देत इस्कॉनचे सर्व दावे अमान्य केल्याचे एसजेटीएने सांगितले.
याशिवाय, पुरीचे मानद राजे गजपती महाराज दिब्यसिंह देव यांनी अवेळी होणाऱ्या रथयात्रेला समर्थन दिल्याचा चुकीचा समज इस्कॉनने निर्माण केल्याचा आरोपही मंदिर प्रशासनाने केला आहे. प्रत्यक्षात महाराजांनी केवळ जर्मनीतील बर्लिन येथे इस्कॉनच्या एका रथयात्रा कार्यक्रमाला भेट दिली होती, त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे एसजेटीएने स्पष्ट केले. दरम्यान, या संपूर्ण वादावर प्रतिक्रिया विचारली असता इस्कॉनचे संपर्क संचालक आणि राष्ट्रीय प्रवक्ते युधिष्ठिर गोविंद दास यांनी एसजेटीएचे अधिकृत निवेदन अद्याप पाहिले नसल्याचे सांगत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. निवेदनाचा अभ्यास केल्यानंतरच याबाबत भूमिका मांडू, असे त्यांनी स्पष्ट केले.