वर्धा
dangerous roadside पावसाळ्याला सुरुवात होताच जिल्ह्यातील रस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे. जिल्ह्यातील महामार्ग, जिल्हा मार्ग तसेच गावांना जोडणार्या अनेक रस्त्यांच्या कडेला असलेली जुनी, वाळलेली आणि कमकुवत झाडे आता जीवावर उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या अगदी कडेला असलेली धोकादायक झाडे वादळी पावसात कधीही कोसळू शकतात.
रस्त्यालगतची झाडे ही पर्यावरणासाठी महत्त्वाची असली तरी त्यांची नियमित पाहणी आणि देखभाल न झाल्यास तीच झाडे जीवघेणी ठरू शकतात. अनेक ठिकाणी झाडांचे बुंधे कमकुवत झाले आहेत, फांद्या रस्त्यावर झुकलेल्या आहेत तर काही झाडं आतून पोखरलेली आहेत. वादळी पावसात ही झाडं उन्मळून पडत अपघात होण्याची शक्यता आहे. वाहन चालकाला ब्रेक लावण्याची किंवा बचाव करण्याची संधी मिळत नसल्याचे अनेक उदाहरणं आहेत.
काही मार्गांवर झाडांच्या फांद्या विद्युत तारांपर्यंत पोहोचल्या आहेत. पावसाळ्यात वार्यासह फांद्या तुटून तारांवर पडल्यास विद्युत अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षेशी जोडलेला आहे. वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाने संयुक्तपणे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची पाहणी करणे आवश्यक आहे. धोकादायक झाडांची छाटणी किंवा हटविण्याची कारवाई करण्याची गरज आहे.रस्त्याच्या कडेला वाळलेली झाडे अनेक ठिकाणी धोकादायक अवस्थेत पोहोचली आहेत. संभाव्य धोका डोळ्यासमोर असतानाही संबंधित यंत्रणांकडून अद्याप ठोस हालचाली दिसत नाहीत.