मतदार पडताळणीबाबत घाबरू नका

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
नागपूर, 
voter-verification : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अन्य शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने नियुक्त झालेल्या अनेक बूथ लेव्हल ऑफिसर्सना (बीएलओ) संबंधित परिसराची पुरेशी माहिती नसल्याने अतिरिक्त मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, एसआयआरबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या विविध शंकांचे निरसन करण्यासाठी प्रशासनाने वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाहीर केली असून, मतदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नियोजित कालावधीत पडताळणी प्रक्रियेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मतदारांच्या प्रमुख प्रश्नांना प्रशासनाची उत्तरे
 
 
 
 
matdar
 
 
प्रश्न : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) म्हणजे काय?
उत्तर : मतदारयाद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणारी विशेष पडताळणी मोहीम.
 
प्रश्न - फॉर्म मिळाला नसेल तर?
 
उत्तर - बीएलओ भेट देईपर्यंत प्रतीक्षा करावी किंवा इसीआयएनइटी ॲप अथवा संबंधित बीएलओशी संपर्क साधून फॉर्म मिळवता येईल.
 
प्रश्न - आधार, पॅन किंवा इतर कागदपत्रे लगेच द्यावी लागतील का?
  
नाही. सध्या केवळ गणना फॉर्म भरायचा आहे. आवश्यक असल्यास नंतर छाननीच्या वेळी कागदपत्रे मागितली जातील.
 
प्रश्न - पालकांची माहिती उपलब्ध नसल्यास?
 
अनाथ किंवा माहिती उपलब्ध नसलेल्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने पर्यायी कागदपत्रे व विशेष पडताळणीची व्यवस्था केली आहे.
 
प्रश्न - फॉर्म भरला नाही तर काय होईल?
 
उत्तर - निर्धारित मुदतीत फॉर्म न भरल्यास संबंधित मतदाराचे नाव मसुदा मतदार यादीत दिसणार नाही. मात्र त्यानंतर दावा व हरकत प्रक्रियेद्वारे संधी उपलब्ध राहील.
 
कोणती कागदपत्रे ग्राह्य धरली जातील?
 
आधार (ओळखीसाठी), पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र, दहावीचे प्रमाणपत्र, शासकीय कर्मचारी ओळखपत्र, पेन्शन आदेश, कायम निवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही, शासकीय जमीन किंवा घर वाटपाची कागदपत्रे, वनहक्क प्रमाणपत्र तसेच १ जुलै १९८७ पूर्वीची शासनमान्य कागदपत्रे यांसह एकूण १२ प्रकारची कागदपत्रे ग्राह्य आहेत.
 
प्रश्न - नाव, पत्ता किंवा आडनावात चूक असल्यास?
 
उत्तर - पडताळणीदरम्यान अथवा सुनावणीच्या प्रक्रियेत आवश्यक पुरावे सादर करून दुरुस्ती करता येईल.
 
प्रश्न : ही मोहीम कधीपर्यंत सुरू राहणार?
 
उत्तर : बीएलओंकडून घरभेटी व गणना प्रपत्र भरण्याची प्रक्रिया २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. दावे-हरकतींची सुनावणी झाल्यानंतर अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या जातील.
 
प्रश्न : गणना प्रपत्रात कोणती माहिती भरावी लागते?
 
उत्तर : मतदाराची वैयक्तिक माहिती, पूर्वीच्या मतदार यादीतील तपशील, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक (ऐच्छिक), पालकांची माहिती आदी तपशील भरून प्रपत्रावर स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा देणे आवश्यक आहे.
 
प्रश्न : नाव पूर्वीच्या एसआयआरमध्ये सापडले नाही तर काय होईल?
उत्तर : अशा मतदारांकडून २००२ मधील वास्तव्याबाबत माहिती घेतली जाईल. आवश्यक तपशील ईसीआयच्या नोंदी किंवा संकेतस्थळाच्या माध्यमातून पडताळला जाईल.
 
प्रश्न : बीएलओ घरी आले असता मतदार किंवा कुटुंबातील सदस्य उपस्थित नसल्यास काय?
 
उत्तर : अशा वेळी बीएलओ भेटीची सूचना ठेवतील. त्यानंतर मतदाराने संपर्क साधून सोयीस्कर वेळी प्रपत्र भरून द्यावे. प्रतिसाद न मिळाल्यास बीएलओ पुन्हा घरभेट देतील.
 
प्रश्न : तीन वेळा घरभेटीनंतरही संपर्क झाला नाही तर?
 
उत्तर : मतदार अनुपस्थित किंवा स्थलांतरित असल्याची नोंद घेतली जाईल. अशा नावांचा प्रारूप मतदार यादीत समावेश होणार नाही.
 
प्रश्न : एका मतदाराचे दोन ठिकाणी नाव असल्यास काय होईल?
उत्तर : एका व्यक्तीचे एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार म्हणून नाव असू शकत नाही. अशा प्रकरणांमध्ये संबंधित मतदाराने कायम वास्तव्यास असलेल्या ठिकाणची नोंद कायम ठेवावी, तर दुसऱ्या ठिकाणची नोंद वगळण्यात येईल. खोटी माहिती दिल्यास कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.