रिसोड,
voter verification भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती देण्यासाठी रिसोड तालुका प्रशासनाने एक अनोखा आणि पारंपरिक मार्ग निवडला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही ग्रामीण भागात प्रभावी ठरणार्या दवंडीच्या माध्यमातून शहरासह संपूर्ण तालुक्यात व्यापक जनजागृती सुरू करण्यात आली आहे. गावोगावी दवंडी देऊन मतदारांना एसआयआर मोहिमेचे महत्त्व पटवून दिले जात असून, वेळेत पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड तालुक्यात ही मोहीम युद्धपातळीवर राबविली जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामीण तथा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, मुख्याधिकारी सतीश शेवदा, नायब तहसीलदार गजानन जवादे आणि पर्यवेक्षक नारायण चहाटे यांच्या नेतृत्वाखालील पथके या मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या पारंपरिक दवंडी पद्धतीमुळे मोहिमेची माहिती अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहे. नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता, तालुक्यातील मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास रिसोड तालुका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
चावडी बनली मतदार जागृतीचे केंद्र
ग्रामीण भागातील मुख्य केंद्र असलेल्या ग्रामपंचायत आणि गावातील चावडीवर दवंडी दिली जात आहे. दवंडी कानी पडताच अनेक गावांमध्ये नागरिक कुतूहलाने आणि जबाबदारीने चावडीवर एकत्र येत आहेत. तिथे उपस्थित असलेल्या बीएलओ आणि पर्यवेक्षकांकडून मतदार यादीतील नावांची पडताळणी करणे, आवश्यक त्या दुरुस्त्या करणे आणि कागदपत्रांची पूर्तता कशी करावी, याची सविस्तर माहिती नागरिक घेत आहेत.
छायाचित्र - गावात दवंडी देतांना एक व्यक्ती