विश्वचषकातून बाहेर पडताच फ्रान्स पेटला

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
पॅरिस,
France crashing out of World Cup फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्पेनकडून झालेल्या २-० च्या पराभवानंतर फ्रान्समध्ये काही भागांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगल्यानंतर संतप्त चाहत्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. अनेक शहरांत तोडफोड, जाळपोळ आणि गोंधळाच्या घटना घडल्याने प्रशासन सतर्क झाले असून अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.उपांत्य फेरीतील सामन्यात स्पेनने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत फ्रान्सला आक्रमणाची फारशी संधी दिली नाही. प्रभावी बचावासह दोन गोल करत स्पेनने अंतिम फेरीत धडक मारली. या पराभवामुळे सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळण्याचे फ्रान्सचे स्वप्न भंगले.
 
 
france
 
सामना संपल्यानंतर फ्रान्समधील विविध भागांत चाहत्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. सोशल मीडियावर समोर आलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये रस्त्यांवर मोठी गर्दी, घोषणाबाजी, वाहनांची तोडफोड आणि पोलिसांशी झटापट झाल्याचे दिसून येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे.या सामन्यात फ्रान्सचा कर्णधार किलियन म्बाप्पे अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. सामन्यानंतर त्याने संघाच्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त करत निर्णायक लढतीत अपेक्षेप्रमाणे खेळ करता आला नसल्याची कबुली दिली. या पराभवानंतर फ्रान्सचा विश्वचषक जिंकण्याचा प्रवास थांबला असून आता संघाला तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळावा लागणार आहे. दरम्यान, फुटबॉलमधील पराभवाचे रूपांतर हिंसाचारात होऊ नये, असे आवाहन प्रशासन आणि क्रीडावर्तुळातून करण्यात आले असून, फ्रान्समधील परिस्थितीवर सुरक्षा यंत्रणांचे बारकाईने लक्ष आहे.