५१ लाखांच्या फसवणूक प्रकरणात दाम्पत्याला अटकपूर्व जामीन

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
fraud-case : फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात ५१ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली इमामवाडा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी नितीन ठमके आणि विद्या नितीन ठमके यांना नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
 
 

fraud-case 
 
 
 
तक्रारदार बलवानी यांनी २०१९ मध्ये टाटा कॅपिटल हाइट्स येथील फ्लॅट खरेदीसाठी नितीन ठमके व विद्या ठमके यांच्याशी १.२० कोटी रुपयांचा करार केला होता. करारानुसार फ्लॅटवरील कर्जाची परतफेड करून बँक व संबंधित संस्थेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी आरोपींनी स्वीकारली होती. त्यासाठी तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने एकूण ५१ लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. मात्र, त्यानंतरही विक्रीखत करून न देता आरोपींनी अधिक पैशांची मागणी केली आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपींकडे दिलेल्या रकमेचा वापर कसा झाला, फ्लॅटची नंतर विक्री कोणाला करण्यात आली आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी कोठडीतील चौकशी आवश्यक आहे. आरोपींना जामीन दिल्यास त्या साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.
 
 
तर बचाव पक्षाने हा वाद पूर्णपणे दिवाणी स्वरूपाचा असल्याचा दावा केला. संबंधित फ्लॅट हा बँकेकडे गहाण असल्याची माहिती तक्रारदाराला आधीपासूनच होती. कर्ज न फेडल्यामुळे ७ डिसेंबर २०२२ रोजी ॲक्सिस बँकेने तो फ्लॅट प्रवीण रत्नाकर लाड यांना २.४२ कोटी रुपयांना विकला. त्यामुळे आरोपींचा त्यात कोणताही दोष नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तसेच यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेनेही हा वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याचे नमूद केले होते, असे बचाव पक्षाचे ॲड. गुरुप्रीतसिंह चंडोक, ॲड. आशिष धाराशिवकर, ॲड. राजेंद्र साहू आणि ॲड.गौरव साहू यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध कागदपत्रांचा विचार करून न्यायालयाने आरोपी विद्या ठमके आणि नितीन ठमके यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.