स्वतंत्र बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग कसा बनला!

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
इस्लामाबाद,
How Balochistan become a part of Pakistan सोशल मीडियावर बलुचिस्तानने स्वतःला 'बलुचिस्तान प्रजासत्ताक' म्हणून घोषित केल्याच्या दाव्यांमुळे या प्रदेशाचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये बलुच सैन्याने मोठा भूभाग ताब्यात घेतल्याचा, स्वतःचा ध्वज, चलन आणि स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था सुरू केल्याचा दावा करण्यात येत असला, तरी या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, या पार्श्वभूमीवर बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग कसा बनला, याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.१९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळी आजच्या बलुचिस्तान प्रदेशात कलात, मकरान, लास बेला आणि खारान अशी चार प्रमुख संस्थाने होती. त्यापैकी कलात हे सर्वात मोठे आणि प्रभावशाली संस्थान मानले जात होते. ११ ऑगस्ट १९४७ रोजी कलातचे शासक मीर अहमद यार खान यांनी कलातला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. ब्रिटिश प्रशासनाने त्या स्वतंत्र कराराला मान्यता दिली होती. त्यामुळे सुरुवातीला कलात हे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही नव्या देशांपासून स्वतंत्र राहिले.
 
 

How Balochistan become 
 
१४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर कलातच्या पाकिस्तानमध्ये विलीनीकरणासाठी चर्चा सुरू झाली. कलातच्या नेतृत्वाची भूमिका स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याची होती. मात्र, सामरिक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून कलातचा पाकिस्तानमध्ये समावेश आवश्यक असल्याची भूमिका पाकिस्तानने घेतली.दरम्यान, मकरान, लास बेला आणि खारान या शेजारील संस्थानांनी पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कलातवर राजकीय आणि सामरिक दबाव वाढला. भौगोलिकदृष्ट्या कलात एकाकी पडल्याने त्याची वाटाघाटी करण्याची ताकदही कमी झाली.
 
काही ऐतिहासिक नोंदींनुसार, त्या काळात कलातने भारताशी संपर्क साधण्याचा किंवा भारतात विलीन होण्याचा पर्यायही विचारात घेतला होता. मात्र, त्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. काही नोंदींमध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भौगोलिक आणि राजकीय कारणांमुळे हा प्रस्ताव पुढे नेला नसल्याचा उल्लेख आहे.मार्च १९४८ च्या अखेरीस परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने कलातमध्ये प्रवेश केला. २७ आणि २८ मार्च १९४८ रोजी कलातचे खान मीर अहमद यार खान यांनी पाकिस्तानमध्ये विलीनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली आणि कलात अधिकृतपणे पाकिस्तानचा भाग बनला. पाकिस्तान या विलीनीकरणाला कायदेशीर आणि वैध मानतो. मात्र, अनेक बलुच राष्ट्रवादी संघटनांचे मत वेगळे आहे. त्यांच्या मते, हे विलीनीकरण लष्करी दबावाखाली झाले होते. त्यामुळे या प्रक्रियेच्या वैधतेवर आजही प्रश्न उपस्थित केले जात असून, बलुचिस्तानचा इतिहास आणि त्याच्या राजकीय स्थितीबाबतचा वाद अद्याप कायम आहे.