माळशेज-ओतूर,
otur police जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळवाडी येथे ग्रामस्थांच्या धाडस, वाटखळे येथील विघ्नेश घोलप यांच्या सतर्कतेमुळे आणि ओतूर पोलिसांच्या नियोजनबद्ध कारवाईत आंतरराज्य 'दुधानी' दरोडेखोर टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश आले.ग्रामस्थांनी दोन संशयितांना घटनास्थळीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर फरार झालेल्या अन्य चार आरोपींना अवघ्या २४ तासांत पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने अटक केली.
प्राथमिक तपासात ही टोळी महाराष्ट्र व तेलंगणातील ५० हून अधिक चोरी, घरफोडी व दरोड्यांच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपींकडून चोरीची बोलेरो गाडी, देशी बनावटीची बंदूक, तलवार, मिरची पूड, कटावणी, टूलकिट व इतर साहित्य असा सुमारे १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपींविरुद्ध ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची अधिक चौकशी सुरू आहे. या टोळीचे इतर राज्यांतील गुन्हेगारी जाळे, साथीदार आणि पूर्वीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. पोलिस पथक तसेच कोळवाडी, आळमे, डिंगोरे व बल्लाळवाडी येथील धाडसी ग्रामस्थांचे विशेष कौतुक करण्यात आले.