वॉशिंग्टन,
Jagu Bhagwanpuria gang आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करत अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने जगू भगवानपुरिया टोळीशी संबंधित नितीश कौशल याला आपल्या 'मोस्ट वॉन्टेड' यादीत समाविष्ट केले आहे. अमेरिकेत सक्रिय असलेल्या या गुन्हेगारी नेटवर्कचा तो महत्त्वाचा सदस्य असल्याचा आरोप एफबीआयने केला आहे.एफबीआयच्या माहितीनुसार, नितीश कौशल आणि त्याच्याशी संबंधित टोळीवर खून, अपहरण, अमली पदार्थांची तस्करी, खंडणी, अवैध शस्त्रांची तस्करी, मनी लॉन्डरिंग आणि मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. तपासात जगू भगवानपुरिया टोळीची मुळे पंजाबमध्ये असल्याचे समोर आले असून, या टोळीचे जाळे अमेरिकेतील कॅलिफोर्नियासह अनेक देशांपर्यंत पसरल्याचे सांगण्यात आले आहे.

एफबीआयच्या तपासानुसार, नितीश कौशलने जगू भगवानपुरिया टोळीच्या वतीने अपहरण, हल्ले आणि इतर हिंसक गुन्ह्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. या प्रकरणात २५ जून २०२६ रोजी कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमधील अमेरिकन फेडरल न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. त्याच्यावर 'रॅकेटियर इन्फ्लुएन्स्ड अँड करप्ट ऑर्गनायझेशन्स कॉन्स्पिरसी ॲक्ट' (RICO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापूर्वी एफबीआयने 'ऑपरेशन हार्डबॉल' या विशेष मोहिमेअंतर्गत अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील जगू भगवानपुरिया टोळीच्या नेटवर्कवर मोठ्या प्रमाणात छापे टाकले होते. या कारवाईदरम्यान ५० हून अधिक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आणि मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे, अमली पदार्थ तसेच इतर बेकायदेशीर साहित्य जप्त करण्यात आले.
एफबीआयच्या या मोहिमेचे लक्ष्य केवळ जगू भगवानपुरिया टोळीपुरते मर्यादित नसून, लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कचाही त्यात समावेश आहे. या संघटनांच्या आर्थिक व्यवहारांपासून ते अमली पदार्थांच्या तस्करीपर्यंत विविध गुन्हेगारी कारवायांवर कारवाई सुरू असल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी अमेरिकेतील एका ग्रँड ज्युरीने अमेरिका, कॅनडा, मेक्सिको आणि भारतात कार्यरत असलेल्या कथित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश करत जगू भगवानपुरिया आणि त्याच्या अनेक साथीदारांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात अमली पदार्थांची तस्करी, अवैध शस्त्रांची तस्करी, खंडणी आणि हत्येचा कट रचल्याचे गंभीर आरोप करण्यात आले असून, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोपर्यंत पसरलेल्या टोळीच्या अमली पदार्थ पुरवठा साखळीचाही तपास यंत्रणांनी उलगडा केला आहे.