नवी दिल्ली,
Legal ban on cockpit voice recording अहमदाबाद येथे गेल्या वर्षी १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत विमान अपघात तपास ब्युरोने (एएआयबी) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग, वैमानिकांचे जबाब आणि तपासाशी संबंधित संवेदनशील माहिती सार्वजनिक करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेवरील अंतिम अहवालाचा मसुदा ऑक्टोबर २०२६ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा असल्याचेही एएआयबीने नमूद केले आहे.एएआयबीने न्यायालयाला सांगितले की, तपासादरम्यान गोळा करण्यात आलेली अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि ध्वनिमुद्रणे कायद्याने गोपनीय ठेवण्याची तरतूद आहे. यामध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग, विमानातील व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग, साक्षीदारांचे जबाब, वैमानिक, एअरलाइन कर्मचारी आणि इतर संबंधितांमधील संभाषणे, एअर ट्रॅफिक कंट्रोलची ध्वनिमुद्रणे तसेच मृत आणि जखमींची वैयक्तिक व वैद्यकीय माहिती यांचा समावेश आहे.

विमान अपघात तपास नियम, २०२५ मधील नियम १७(५) नुसार उड्डाणादरम्यानची ध्वनिमुद्रणे सार्वजनिक करण्यास कायदेशीर बंदी असल्याचे एएआयबीने स्पष्ट केले. अशी माहिती सार्वजनिक झाल्यास भविष्यात साक्षीदार किंवा संबंधित कर्मचारी निर्भयपणे माहिती देण्यास कचरतील, त्यामुळे अपघाताच्या निष्पक्ष तपासावर परिणाम होऊ शकतो, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.एएआयबीने सांगितले की, हा तपास केवळ भारतीय नियमांनुसार नव्हे तर आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (ICAO) च्या परिशिष्ट १३ आणि शिकागो करारानुसार केला जात आहे. या प्रक्रियेत विमान उत्पादक कंपनी, संबंधित एअरलाइन आणि इतर देशांच्या तपास यंत्रणांचाही सहभाग असतो. या तपासाचा उद्देश कोणालाही दोषी ठरवणे नसून, दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना निश्चित करणे हा आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार, उर्वरित तपास पुढील सहा आठवड्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर उपलब्ध पुरावे आणि तथ्यांचे विश्लेषण करून ऑक्टोबर २०२६ पर्यंत अंतिम अहवालाचा मसुदा तयार करण्यात येणार आहे.मृत वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांचे वडील पुष्कराज सभरवाल, फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स आणि 'सेफ्टी मॅटर्स फाउंडेशन' या संस्थेने दाखल केलेल्या याचिकांच्या उत्तरात एएआयबीने हे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. १२ जून २०२५ रोजी एअर इंडियाचे एआय-१७१ हे विमान अहमदाबादहून लंडनमधील गॅटविक विमानतळाकडे उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या परिसरात कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला, तर जमिनीवरील १९ जणांचाही जीव गेला. एकूण २६० जणांचा बळी गेलेल्या या दुर्घटनेचा भारतातील सर्वात भीषण हवाई अपघातांमध्ये समावेश केला जातो.