महावितरण अभियंत्यावर जीवघेणा हल्ला

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
life-threatening-attack : तालुक्यातील वरुड जहागीर येथे वीज चोरीविरोधातील कारवाईदरम्यान महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना रविवार, 13 जुलै रोजी घडली. या प्रकरणी राळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल होताच मुख्य आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
 
 
prisoners-thrashed-the-jail-official
 
 
 
महावितरणच्या झाडगाव केंद्राचे कनिष्ठ अभियंता भारत श्यामराव चव्हाण, प्रधान तंत्रज्ञ मनोज डंभारे, वरिष्ठ तंत्रज्ञ कपिल नाहाते व विद्युत सहायक हर्षल ढोले हे वरुड जहागीर येथे वीज चोरीची तपासणी करण्यासाठी गेले होते. सुरुवातीला एका ग्राहकाकडे वीज चोरी आढळून आल्यानंतर पंचनामा करण्यात आला. त्यानंतर तांडा वस्तीत तपासणीदरम्यान तुषार भाऊराव मडावी हा लघुदाब वीजवाहिनीवरून केबलच्या सहायाने बेकायदेशीर वीज वापरत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. वीज चोरीबाबत विचारणा करून कारवाई सुरू असताना संबंधिताने इतरांच्या नावावर कारवाई करण्याचा आग्रह धरला.
 
 
मात्र प्रत्यक्ष वीज चोरी त्याच्याकडून होत असल्याने त्याच्याविरुद्धच कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाèयांनी स्पष्ट केले. यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले. पथक पुराव्यासाठी मोबाईलवर चित्रिकरण करत असताना तुषार मडावी याने शिवीगाळ करत अधिकाèयांचा मोबाईल हिसकावून घेतला, धक्काबुक्की केली तसेच कार्यालयीन कागदपत्रे फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
 
त्यानंतर आरोपी घरात जाऊन कोयता घेऊन आला व कनिष्ठ अभियंता चव्हाण यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांनी वार चुकवून कोयता पकडल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली. मयूर मोहन राठोड यांनी धाव घेऊन आरोपीला आवर घातल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच आरोपीची पत्नी वैशाली मडावी व आई जिजाबाई मडावी यांनीही कारवाईत अडथळा आणत आरोपीला उत्तेजन दिल्याचे तक्रारत नमूद आहे.