मुंबई
maharashtra economy महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने देशाचे ‘आर्थिक इंजिन’ असून, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम राज्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या (कॅग) २०२४-२५ च्या अहवालानुसार, चालू किमतींनुसार राज्याचे एकूण उत्पन्न तब्बल ४५,३१,५१८ कोटी रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचले आहे. राज्याचा आर्थिक विकासदर मागील वर्षीच्या ११.३८ टक्क्यांवरून झेप घेत यंदा ११.७३ टक्क्यांवर पोहोचला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राने सर्वाधिक १३.७० टक्के इतका सिंहाचा वाटा उचलून आपले देशातील अव्वल स्थान भक्कम केले आहे.
राज्याच्या या नेत्रदीपक प्रगतीमध्ये विविध क्षेत्रांनी मोलाचे योगदान दिले असून, त्यात सेवा क्षेत्राने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तब्बल ७.८ टक्क्यांच्या दमदार वाढीसह हे क्षेत्र अर्थव्यवस्थेचा सर्वात गतिमान घटक ठरले आहे. राज्याच्या एकूण उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा तब्बल ६४ टक्के इतका प्रचंड असून, त्याचा राज्याच्या एकूण आर्थिक विस्तारावर अत्यंत सकारात्मक परिणाम झाला आहे.
सेवा क्षेत्रासोबतच शेती आणि औद्योगिक क्षेत्रानेही राज्याच्या अर्थव्यवस्थेला भक्कम पाठबळ दिले आहे. मागील काही वर्षांतील चढ-उतार आणि हवामान बदलाचा खंबीरपणे सामना करत, यंदा कृषी आणि संबंधित व्यवसायांनी प्रगतीचा सकारात्मक मार्ग धरला आहे. यासोबतच, कारखानदारी आणि उत्पादन क्षेत्राने महासाथीनंतरच्या काळात स्थिर कामगिरी करत ४.९ टक्क्यांचा विकासदर राखला आहे. भविष्यात राज्यात येणारी गुंतवणूक आणि औद्योगिक वाढीची सुधारलेली गती यातून स्पष्ट होते.
पायाभूत सुविधांमधील वाढती गुंतवणूक आणि सेवा क्षेत्राची वेगाने सुरू असलेली प्रगती यामुळे महाराष्ट्राचा आर्थिक विकास अतिशय भक्कम आणि शाश्वत मार्गावर असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर मंदीचे सावट असतानाही महाराष्ट्राने राखलेला हा दुहेरी अंकी विकासदर राज्याला आर्थिक प्रगतीच्या एका नव्या शिखरावर घेऊन जाणार आहे.