मिलिंद माधव ठेंगडी यांचे निधन

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
नागपूर,
milind madhav thengdi passes away ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक, लेखक आणि 'ज्योतिष प्रवाह' या त्रैमासिकाशी निगडित कार्यामुळे ओळखले जाणारे मिलिंद माधव ठेंगडी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर समोर आल्यानंतर ज्योतिष क्षेत्रातील तसेच त्यांच्या परिचयातील अनेकांना धक्का बसला. अंत्यसंस्कार सहकारनगर स्मशानभूमीत पार पडले. मिलिंद ठेंगडी हे ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास करणारे, मात्र त्याचा व्यावसायिक लाभ न घेता समाजोपयोगी मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. वृत्तपत्रांमध्ये राशीभविष्य लेखन, ज्योतिष विषयक लेखन आणि 'ज्योतिष प्रवाह' या त्रैमासिकाच्या टाइपसेटिंग, प्रूफरीडिंग, वितरण तसेच सदस्य नोंदणीची जबाबदारी त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. गंभीर आजारातून सावरल्यानंतरही त्यांनी कार्याचा ध्यास सोडला नव्हता.
 
milind madhav thengdi
 
उच्च मधुमेह आणि प्रकृतीच्या अडचणी असूनही त्यांनी ज्योतिषविद्येचा प्रसार अखंड सुरू ठेवला. अनेकांना ते फोनवरूनही निःस्वार्थपणे ज्योतिष विषयक मार्गदर्शन करत असत. त्यांच्या अभ्यासू वृत्तीबरोबरच साधेपणा, निगर्वी स्वभाव आणि जिव्हाळ्याचे संबंध जपण्याची त्यांची शैली सर्वांना भावत होती. ज्योतिषाबरोबरच त्यांना नर्मदा परिक्रमा, नदीसंवर्धन आणि पर्यावरण विषयांमध्येही विशेष रस होता. विदर्भातील नद्यांच्या संवर्धनासाठी काम करण्याबाबत त्यांनी चर्चा केली होती. पुण्यात मुलीकडे वास्तव्यास असताना कुटुंबीयांसोबत वेळ घालवत असल्याची माहिती त्यांनी काही दिवसांपूर्वी मित्रांना दिली होती. त्यांच्या अकस्मात निधनामुळे ज्योतिषविश्वाने एक अभ्यासू, संतुलित आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या कार्याची आणि समाजाशी असलेल्या आत्मीय नात्याची आठवण कायम राहील, अशा भावना त्यांच्या मित्रपरिवाराने आणि ज्योतिष अभ्यासकांनी व्यक्त केल्या आहेत.
सौजन्य: किशोर पौनीकर, संपर्क मित्र