तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
nandadeep-foundations : हरवलेला माणूस जेव्हा पुन्हा आपल्या माणसांच्या कुशीत परततो, तेव्हा तो फक्त एक पुनर्मिलनाचा क्षण नसतो, तो माणुसकीचा विजय असतो. अशीच घटना नंददीप फाउंडेशनच्या प्रयत्नामुळे साकारास आली आणि हरवलेल्या भावाला दहा वर्षांनी बहिण मिळाली.
धुळे जिल्ह्यातील सडगाव येथील धनराज नथ्थुतुंगा बागले हे ऊसतोडीच्या कामासाठी घराबाहेर पडले. नियतीच्या कठोर खेळात तब्बल दहा वर्षे आपल्या कुटुंबापासून दूर राहिले. काळ पुढे सरकत गेला, पण कुटुंबियांची वाट पाहणारी नजर कधीच थांबली नाही.
सुमारे चार वर्षांपूर्वी धनराजला अत्यंत दयनीय, उपाशी, अस्वच्छ व मानसिक अस्थिर अवस्थेत नंददीप फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना स्वतःची ओळखही व्यवस्थित सांगता येत नव्हती.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांच्या उपचारांमुळे व संस्थेच्या प्रेम, माया व सातत्यपूर्ण सेवेमुळे धनराज यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली. त्यानंतर त्यांच्या तुटक आठवणींच्या धाग्यांवरून कुटुंबाचा शोध सुरू झाला.
फाउंडेशनने चारवेळा स्वतंत्र शोधमोहीम राबवली. धुळे, नंदुरबार, नाशिक तसेच गुजरात सीमावर्ती भागातील अनेक गावे पिंजून काढण्यात आली. शोधमोहीमेदरम्यान एका टप्प्यावर धनराज यांची प्रकृती गंभीर झाली, त्यांना वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथे दाखल करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यात यश आले.
अखेर धनराज यांची बहीण वजाबाई जाधव यांचा शोध लागला व तब्बल दहा वर्षांनंतर या बहिणभावंडांचे भावनिक पुनर्मिलन घडून आले. अनेक वर्षे मनात साठलेले दुःख त्या एका मिठीत विरघळून गेले.
ही संपूर्ण शोधमोहीम संदीप शिंदे यांच्या नेतृत्वात कृष्णा मुळे, अक्षय बानोरे, स्वप्निल साळवे, कार्तिक भेंडे आणि निशांत सायरे यांनी पूर्ण केली.