युक्रेनवरील अणुहल्ला मोदींच्या हस्तक्षेपामुळे टळला

पोलंडच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांचा खुलासा; पंतप्रधानांचे कौतुक

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
वॉर्सा, 
pm-modi : युद्धाच्या पहिल्या टप्प्यात रशियाने युक्रेनची राजधानी कीव्ह शहरावर अणुहल्ला करण्याची तयारी केली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेऊन पंतप्रधान मोदी यांनी त्यांची समजूत घातली. मोदींनी हस्तक्षेप केल्यामुळेच रशियाने अणुहल्ल्याची योजना मागे घेतली आणि हजारो नागरिकांचे प्राण वाचले, असा खुलासा पोलंडचे उपपरराष्ट्र मंत्री व्लादिस्लाव थिओफिल बार्टोशेवेस्की यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतून केला.
 

modi 
 
पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच युक्रेन बेचिराख होण्यापासून आणि जग अण्वस्त्र हल्ल्यापासून बचावले. २०२२ च्या अखेरीस युक्रेनमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना सामरिक अण्वस्त्रांचा वापर करण्यापासून रोखण्यात पंतप्रधान मोदींनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बार्टोशेवेस्की यांनी म्हटले. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी पंतप्रधान मोदीच मध्यस्थी करू शकतात असाही दावा त्यांनी केला. अलिप्त राष्ट्र म्हणून भारताचे रशिया आणि पूर्वीच्या सोव्हिएत युनियनसोबत दीर्घकाळचे संबंध आहेत. मोदी हे अशा मोजक्या जागतिक नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांचा सल्ला पुतीन गांभीर्याने घेतात.
 
सप्टेंबर २०२२ मध्ये उझबेकिस्तानमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान पुतीन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मोदींनी आजचे युग हे युद्धाचे नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्यांनी संघर्षाऐवजी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले. मोदींनी पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की या दोघांशीही संपर्क कायम ठेवला आहे. त्यांच्या हस्तक्षेपामुळे युक्रेनमध्ये मोठा विध्वंस टळला.
भारताच्या भूमिकेचे समर्थन
 
 
रशियासोबतचा ऊर्जा व्यापार कमी करण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांकडून सातत्याने दबाव असूनही भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करणे सुरूच ठेवले. भारताने नेहमीच आपली तेल खरेदी ही ऊर्जा सुरक्षा आणि राष्ट्रीय हितासाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आणि हे योग्यच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इराण युद्धाच्या संदर्भातही बार्टोशेवेस्की यांनी भारताच्या भूमिकेचे समर्थन केले.