अनिल कांबळे,
नागपूर,
sexual-exploitation : गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कामाच्या ठिकाणी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका विवाहित महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तिच्या नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत अनेकदा तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला (वय ४०) विवाहित असून तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पतीशी कौटुंबिक वाद असल्याने ती मुलांसह वेगळी राहत आहे. संकटा राम अवतार सिंह (वय ४५, रा. आजमगड, उत्तर प्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तक्रारीनुसार, पीडित महिला आणि आरोपी एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्यांची ओळख झाली. त्यानंतर आरोपीने महिलेशी जवळीक वाढवली.
२० ऑक्टोबर २०२४ रोजी आरोपीने गणेशपेठ बसस्थानकाजवळील हॉटेल कृष्णा येथे महिलेला बोलावले. त्यानंतर ५ जानेवारी २०२५ आणि १३ जुलै २०२५ रोजी वेगवेगळ्या वेळी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याच दरम्यान आरोपीने महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ तयार केले. हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तिच्या नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत आरोपी सातत्याने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. बदनामीच्या भीतीने महिला दीर्घकाळ गप्प राहिली. मात्र, सततच्या धमक्यांना कंटाळून तिने १३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास गणेशपेठ पोलीस करीत आहेत.