‘एक विलक्षण प्रवास रामगिरी ते अलका !’

कार्यक्रमातून मेघदूताचा चित्रमय रसास्वाद

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी,
kalidasa-day  : शिक्षण प्रसारक मंडळ, वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे कालिदास दिनाच्या पूर्वसंध्येला महाविद्यालयाच्या सभागृहात ‘एक विलक्षण प्रवास रामगिरी ते अलका’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या सहायाने साकारलेल्या चित्रमय सादरीकरणातून महाकवी कालीदास यांच्या मेघदूतम् या अजरामर काव्याचा बहुआयामी परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला.
 
 
 
y15July-Meghdoot
 
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे होते. यावेळी बोलताना त्यांनी महाकवी कालिदासांची प्रतिभा विविध अंगांनी समृद्ध असल्याचे सांगितले. मेघदूतम्च्या माध्यमातून भारताचा भूगोल, इतिहास, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पुराणकथा, मानवी मनोविज्ञान, सामाजिक मूल्ये, प्रेमातील विरहभाव व निसर्गवर्णन अशा विविध विषयांचे प्रभावी दर्शन घडते. या सर्व पैलूंचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहायाने चित्ररूप सादरीकरण करणारा हा अभिनव प्रयोग अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
संस्कृत विषयाचे अभ्यासक विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले अभ्यासक्रम व उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले.
 
 
त्यानंतर डॉ. स्वानंद पुंड यांनी मेघदूतम्च्या पूर्वमेघातील 65 श्लोकांवर आधारित 65 चित्रांच्या माध्यमातून काव्याचे सखोल रसग्रहण घडविले. प्रत्येक चित्रातून महाकवी कालिदास यांच्या प्रतिभेतील सुक्ष्म बारकावे, काव्यसौंदर्य व आशय विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे उलगडून दाखविण्यात आला.
 
 
कार्यक्रमासाठी नितेश चामाटे व संजय बिलोरिया यांनी विशेष सहकार्य केले. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विशेष म्हणजे, संस्कृत विषयाचा अभ्यास नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांनीही या चित्रमय सादरीकरणाने प्रेरित होऊन मेघदूतम्चा संपूर्ण अभ्यास करण्याची उत्सुकता व्यक्त केली.