हॉटेल सेंटर पॉईंटमधील एमडी पार्टीवर पोलिसांचा छापा

- तीन युवकांना अटक

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
police-raid : शहरातील एका हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाचे सेवन करताना गोंदिया येथील तिघांना सीताबर्डी पोलिसांनी रंगेहात अटक केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी १.६४० ग्रॅम एमडी पावडर जप्त केली असून, आरोपींनी एकूण २.५ ग्रॅम एमडी विकत घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मयंक महेश अग्रवाल (वय ३०, रा. गणेशनगर, गोंदिया), पराग सुरेश अग्रवाल (वय ३१, रा. सिव्हिल लाईन्स, इंगळे चौक, गोंदिया) आणि कुणाल किशोर नाखाते (वय २३, रा. सिव्हिल लाईन्स, गोंदिया) यांचा समावेश आहे.
 
 
jk
पोलिस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही युवकांनी २.५ ग्रॅम एमडी पावडर खरेदी केली होती. त्यातील काही अमली पदार्थाचे त्यांनी शहरातील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये एकत्रित सेवन केले. याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सीताबर्डी पोलिसांच्या पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत संबंधित हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत घटनास्थळावरून १.६४० ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. कारवाईनंतर तिन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांनी अमली पदार्थाचे सेवन केले होते का, याची खात्री करण्यासाठी त्यांच्या रक्त व मूत्राचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. फिर्यादी पोलिस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध अंमली पदार्थ आणि प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेला एमडी कोठून आणला गेला आणि या अमली पदार्थांच्या पुरवठ्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास सीताबर्डी पोलिस करीत आहेत.