अनिल कांबळे,
नागपूर,
prisoners-thrashed-the-jail-official : मध्यवर्ती कारागृहात न्यायाधीन असलेल्या दोन कैद्यांनी एका श्रेणी एक तुरुंगाधिकाऱ्यांवर हल्ला केला. अधिकाऱ्यावर हल्ला करीत शिवीगाळ केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता छोटी गोल विभागातील बरॅक क्रमांक एक समोर घडली. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला.
दिपक उर्फ खट्या रामकृष्ण घनचक्कर( वय ४१, रा. श्रीकृष्ण नगर, हिंगणा) आणि नादीर खान आतीख खान पठाण (वय २८ रा. हसनबाग गल्ली, नंदनवन) अशी आरोपी बंदीवानाची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वामन तुकाराम निमजे हे नागपूर मध्यवर्ती कारागृहात तुरूंग अधिकारी श्रेणी–एक या पदावर कार्यरत आहेत. ते मंगळवारी सायंकाळी सहा वाजता मध्यवर्ती कारागृहाच्या छोटी गोल परिसरात कैद्यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेत होते. यादरम्यान, बंदीवान खट्या घनचक्कर आणि नादीर खान या दोघांनी संगनमतांनी तुरुंगाधिकारी वामन निमजे यांना शिवीगाळ केली. त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बंदीवानांनी तुरुंगाधिकारी निमजे यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाण करीत त्यांना पिटाळून लावले. या प्रकरणी निमजे यांच्या तक्रारीवरुन धंतोली पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी बंदी खट्या आणि नादीर खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.