४१ मिनिटं, शेवटचा फोन अन् कायमचा निरोप!

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
पुणे,
Pune's Heramba ends in the Gulf इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचा फटका आता महाराष्ट्रालाही बसला आहे. ओमानच्या सागरी हद्दीत व्यापारी जहाजावर झालेल्या हवाई हल्ल्यात पुण्यातील मर्चंट नेव्ही अभियंता हेरंब करमरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हल्ल्यापूर्वी अवघ्या काही मिनिटांपूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबीयांशी फोनवर संवाद साधला होता. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीयांसह पुणे शहरावर शोककळा पसरली आहे.हेरंब करमरकर हे एम. व्ही. जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर कार्यरत होते. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हे जहाज ओमानच्या सागरी हद्दीतून प्रवास करत असताना त्यावर हवाई हल्ला झाला. हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रूमजवळ भीषण आग लागली. त्यावेळी हेरंब करमरकर इंजिन रूम परिसरात काम करत असल्याने या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
 

346467 
 
जहाजावरील एकूण २४ कर्मचाऱ्यांपैकी २३ जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली. मात्र, हेरंब करमरकर यांना वाचवता आले नाही. हल्ल्यापूर्वी रविवारी पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी त्यांनी पुण्यातील आपल्या कुटुंबीयांशी शेवटचे बोलणे केले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांच्या कंपनीने नातेवाईक रविंद्र टंडन यांना दूरध्वनीद्वारे हेरंब यांच्या निधनाची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे आखाती प्रदेशातील परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे.
 
 
अमेरिकेकडून इराणमधील विविध ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत असून, त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून अमेरिकेचे मित्रदेश, त्यांच्या लष्करी तळांच्या आसपासचा परिसर आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप आहे. हेरंब करमरकर ज्या जहाजावर कार्यरत होते, त्यावरील हल्लाही या संघर्षाशी संबंधित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही अशाच एका हल्ल्यात काही भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. या ताज्या घटनेमुळे आखाती संघर्षात भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.