अवतार’ने ‘ठिकाना’ची कथा चोरली?

कॉमेडियन राजीव ठाकूर यांच्या दाव्याने चर्चेला उधाण

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
मुंबई
rajiv thakur बॉलिवूडमधील अनेक सिनेमांवर साऊथ आणि हॉलिवूड चित्रपटांच्या कथांची नक्कल केल्याचे आरोप वारंवार होत असतात. केवळ कथांपुरतेच नव्हे, तर गाण्यांपासून बॅकग्राउंड स्कोअरपर्यंत अनेक गोष्टींच्या अनुकरणावरूनही चर्चा रंगत असते. मात्र, आता याच मुद्द्यावर एक वेगळा दावा समोर आला आहे. प्रसिद्ध कॉमेडियन राजीव ठाकूर यांनी हॉलिवूडमधील मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘अवतार’ या चित्रपटावर बॉलिवूडच्या ‘ठिकाना’ या सिनेमाची कथा घेतल्याचा आरोप केला आहे.
 

rajiv thakur claims james cameron avatar copied anil kapoor film thikana story 
एका पॉडकास्टमध्ये बोलताना राजीव ठाकूर यांनी म्हटले की, भारताकडून हॉलिवूड चित्रपटांची नक्कल केली जाते, असे अनेकदा सांगितले जाते. मात्र, जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित ‘अवतार’ हा अनिल कपूर यांच्या 1980 च्या दशकातील ‘ठिकाना’ या बॉलिवूड चित्रपटाची नक्कल असल्याचा त्यांचा दावा आहे. ‘ठिकाना’ची कथा ऐकल्यानंतर ती ‘अवतार’च्या कथेशी इतकी साम्य दाखवते की, तिला 10 पैकी 10 गुण मिळतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.पॉडकास्टमध्ये वैभव मुंजाल यांनी राजीव ठाकूर यांना तुम्ही जेम्स कॅमेरॉन यांच्या ‘अवतार’ चित्रपटाबद्दल बोलत आहात का, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राजीव ठाकूर म्हणाले, “हो, जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार’. मी इथे एक धाडसी वक्तव्य करत आहे. पण जर तुम्ही ‘ठिकाना’ची कथा ऐकली, तर तुमचीही खात्री पटेल की त्याची कथा अगदी ‘अवतार’सारखीच आहे.”
यानंतर राजीव ठाकूर यांनी अनिल कपूर यांच्या ‘ठिकाना’ चित्रपटाची कथा सांगितली. त्यांच्या मते, हा चित्रपट एका पोलीस अधिकाऱ्याच्या कथाभोवती फिरतो. अनिल कपूर यांनी यात पोलीस दलातील एका सदस्याची भूमिका साकारली आहे. चित्रपटात एका गावात राहणाऱ्या दरोडेखोरांच्या गटाची कथा दाखवण्यात आली असून, ज्येष्ठ अभिनेते प्राण यांनी त्या टोळीच्या प्रमुखाची भूमिका साकारली आहे, तर पूनम ढिल्लन यांनी त्यांच्या मुलीची भूमिका केली आहे.राजीव ठाकूर यांनी सांगितले की, पोलिसांकडून अनिल कपूर यांच्या पात्राला दरोडेखोराचा वेश धारण करून त्या टोळीत घुसखोरी करण्याची जबाबदारी दिली जाते. ते या मोहिमेत यशस्वी होतात. या प्रवासात त्यांना पूनम ढिल्लन यांच्या पात्रावर प्रेम जडते. त्यानंतर दोघे मिळून गावातील दरोडेखोरांना शरणागती पत्करण्यास तयार करतात.
मात्र, या कथेत पोलीस दलातील एका भ्रष्ट अधिकाऱ्याचीही भूमिका आहे. हा अधिकारी सर्व दरोडेखोरांचा खात्मा करण्याचा निर्णय घेतो आणि गावावर हल्ला करण्याची योजना आखतो. अनिल कपूर यांचे पात्र त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि दरोडेखोरांना शांततेने शरणागती पत्करायला लावता येईल, असा विश्वास व्यक्त करते. मात्र, भ्रष्ट अधिकारी आपल्या निर्णयावर ठाम राहतो आणि हल्ल्याची तयारी पुढे सुरू ठेवतो. अशा परिस्थितीत पोलीस अधिकारी असूनही अनिल कपूर यांचे पात्र दरोडेखोरांच्या बाजूने उभे राहून त्यांच्यासाठी लढण्याचा निर्णय घेते, असे राजीव ठाकूर यांनी सांगितले.
दरम्यान, जेम्स कॅमेरॉन यांच्या ‘अवतार’ चित्रपटाची कथा जेक सली या माजी मरीन सैनिकाभोवती फिरते. ‘रिसोर्स डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन’ (RDA) या संस्थेला पँडोरा ग्रहावरून ‘अनऑब्टेनियम’ (Unobtanium) हे मौल्यवान खनिज मिळवून देण्यासाठी जेक जनुकीयदृष्ट्या तयार केलेल्या ‘नावी-मानव’ (Na’vi-human) संकरित शरीराचा वापर करतो.मात्र, पँडोरा ग्रहावरील ‘नावी’ जमातीच्या प्रमुखाची मुलगी नेतिरी हिच्यावर जेकचे प्रेम जडते. त्यानंतर जेव्हा कर्नल माइल्स क्वारिच या जमातीवर हल्ला करतात, तेव्हा जेक आपली बाजू बदलतो आणि ‘नावी’ लोकांच्या बाजूने उभा राहून त्यांच्यासाठी लढतो.राजीव ठाकूर यांच्या या दाव्यानंतर ‘अवतार’ आणि ‘ठिकाना’ या दोन्ही चित्रपटांच्या कथांमधील साम्याबाबत सोशल मीडियावर आणि चित्रपटप्रेमींमध्ये चर्चा सुरू झाली आहे.