‘त्या’ वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या हालचाली

वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर : चार गावांतील नागरिकांना दिलासा

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
समुद्रपूर,
Rani the Tigress of the Girad Forest Range गिरड वनक्षेत्रातील ‘राणी’ वाघिणीच्या दोन वर्षीय नर छाव्याने पिंपळगाव, उंदीरगाव, साखरा आणि जोगीनगुंफा परिसरात दहशत निर्माण केल्याने वनविभागाने त्याला जेरबंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वाघाला पकडण्याचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा वाघ जंगलाबाहेर येऊन शेतशिवारात वावरत असून, त्याने अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केले. या हल्ल्यात काही जनावरे ठार तर काही जखमी झालेली आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर पिंपळगाव येथील नागरिकांनी उपवनसंरक्षक हरवीर सिंग व सहाय्यक वनसंरक्षक हरीश सरोदे यांची वर्धा येथे भेट घेऊन वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. या मागणीची दखल घेत उपवनसंरक्षक हरवीर सिंग यांनी वाघाला पकडण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
 
 
Girad Forest Range
 
 
दोन वर्षांपूर्वी गिरड परिक्षेत्रातील राणी वाघिणीने चार पिलांना जन्म दिला होता. त्यापैकी एकाचा धोडगावजवळ अपघाती मृत्यू झाला तर दोन पिलांना वनविभागाने जेरबंद केले होते. त्यावेळी त्या वाघांकडून कोणताही उपद्रव झाला नसल्याने त्याला जंगलातच सोडण्यात आले होते. मात्र, मोठा झाल्यानंतर या वाघाने खुर्सापार जंगल सोडून पिंपळगाव, उंदीरगाव, साखरा व जोगीनगुंफा शेतशिवारात वास्तव्य सुरू केले. अद्याप त्याने कोणत्याही व्यक्तीवर हल्ला केलेला नसला तरी भक्ष्याच्या शोधात पाळीव जनावरांवर वारंवार हल्ले केल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.पुढे कोणतीही अनुचित दुर्घटना घडू नये, यासाठी उपवनसंरक्षक हरवीर सिंग व सहाय्यक वनसंरक्षक हरीश सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे यांनी वाघाला पकडण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव सादर केला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर आवश्यक कारवाई करून वाघाला जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे यांनी दिली.