जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

अमरावती मनपाच्या आमसभेत ठराव मंजूर

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
अमरावती, 
birth-and-death-certificates : महापालिकेची बुधवारची सर्वसाधारण आमसभा जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांवरून चांगलीच गाजली. दोन्ही प्रमाणपत्र मिळण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत, त्या निकाली काढण्याचा विनंती ठराव सभेत एकमुखाने मंजूर करण्यात आला. नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रमाणपत्राची प्रक्रिया सुलभ करण्याची अपेक्षा ठरावावर बोलताना नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात आली.
 
 
 
hn
 
 
 
जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्याची सर्व कार्यपद्धती केंद्र सरकारने ठरवून दिली आहे. देशभरात हीच पद्धत अवलंबली जात आहे. पण, या नव्या प्रक्रियेमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्याने काही नागरिकांना दाखले अजूनही मिळाले नाही तर काहींना फारच विलंबाने मिळत आहेत. नागरिक याचे खापर महापालिकेच्या कारभारावर फोडत आहे. मुळात मनपा स्तरावर दाखले देण्याचे अधिकार मर्यादित आहे. त्याच अनुषंगाने आजच्या आमसभेत विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी मनपा स्तरावरील दाखले देण्याचे अधिकार वाढविण्यात यावे आणि संख्येची मर्यादा काढून टाकावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी व स्थानिक खासदार अनिल बोंडे व बळवंत वानखडे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असा ठराव मांडला. या ठरावाचे सभागृह नेते चेतन गावंडे यांनी जोरदार समर्थन केले. उपस्थित सदस्यांनी सुद्धा हा ठराव योग्य असून मंजूर करावा, अशी भावना व्यक्त केली. सभापती श्रीचंद तेजवानी यांनी हा ठराव मंजूर करून मागणीसह मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याचे निर्देश दिले. याशिवाय अन्य विषयांवर आमसभेत चर्चा झाली.
 
//चौकशीनंतर कारवाईचा निर्णय
 
 
१७०९ जन्म व मृत्यू दाखले आणि त्यातील ५०४ नागरिकांवर झालेल्या फाैजदारी कारवाईचे प्रकरण सभागृहात चर्चेत आले. या प्रकरणात आरोग्य अधिकारी डाॅ. विशाल काळे व डाॅ. प्रतिभा आत्राम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी आमसभेच्या मान्यतेसाठीचा प्रशासकीय विषय सभागृहात आला होता. या विषयाला सदस्यांनी विरोध केला. जे दाखले देण्यात आले हाेते, ते काही या दोनच अधिकाऱ्यांनी दिले नव्हते. वरिष्ठांच्या आदेशाने त्यांनी काम केले होते. तसेच त्यात इतरांचाही सहभाग होता. पहिले या प्रकरणाची सखोल चौकशी करा, त्यात जो दोषी आढळेल त्यावर कारवाई करण्याची मान्यता देण्यात येईल, असे एकमत सभागृहात झाल्याने सदर विषय निकालात निघाला.
 
 
‘तरुण भारत’चे मानले आभार
 
 
जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यासाठी ज्या अडचणी येत आहे, त्याचा सविस्तर आढावा घेणारा ‘जन्म-मृत्यू सुलभ, प्रमाणपत्र कठीण’ हा लेख वेध स्तंभांतर्गत बुधवारी ‘तरुण भारत’मध्ये प्रकाशित झाला होता. सभागृह नेते चेतन गावंडे यांनी त्या लेखाची प्रत सभागृहात झळकवित आपल्या भाषणात त्याचा गाैरवपूर्ण उल्लेख करीत ‘तरुण भारत’चे आभार मानले. या लेखातील माहितीमुळे नागरिकांचा संभ्रम दूर होईल, वास्तविकता समजेल आणि सरकारला सुद्धा तीव्रता लक्षात येईल, अशी भावना व्यक्त केली.