मॉस्को,
Russia allegations against US इराणविरुद्ध अमेरिकेने केलेल्या अलीकडील लष्करी कारवाईनंतर रशियाने तीव्र नाराजी व्यक्त करत वॉशिंग्टनवर गंभीर आरोप केले आहेत. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी अमेरिकेने तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे (एमओयू) उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. या कारवाईमुळे केवळ इराणचेच नव्हे, तर पर्शियन गल्फ परिसरातील नागरी पायाभूत सुविधांचेही नुकसान झाल्याने संपूर्ण प्रदेशातील स्थैर्य धोक्यात आल्याचे त्यांनी म्हटले.मॉस्कोमध्ये चाडचे परराष्ट्र मंत्री यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत लावरोव्ह यांनी अमेरिकेच्या नव्या लष्करी मोहिमेवर टीका केली. इराण आणि अमेरिकेदरम्यान तणाव कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या कराराच्या उद्देशालाच या कारवाईने तडा दिला असून, कोणत्याही मतभेदावर लष्करी मार्ग हा उपाय ठरू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लावरोव्ह यांच्या मते, इराणसह पर्शियन गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) सदस्य देशांतील अनेक नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. अशा कारवायांमुळे संपूर्ण परिसरात अस्थिरता वाढेल आणि शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर परिणाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला.अमेरिकेसोबत भविष्यात होणाऱ्या कोणत्याही करारावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचेही लावरोव्ह यांनी नमूद केले. अलास्कामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेचा उल्लेख करत, यापूर्वीचे अनेक करार पूर्णपणे पाळले गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या हल्ल्यांना संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे उल्लंघन ठरवत तीव्र निषेध नोंदवला आहे. युद्धविराम आणि तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना अमेरिकेने धक्का दिल्याचा आरोप करत, वाहतूक व्यवस्था, मालवाहू जहाजे आणि इतर नागरी सुविधांनाही लक्ष्य करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे. या घडामोडींनंतर इराणने सुरक्षेच्या कारणास्तव होर्मुझ सामुद्रधुनीतील जलवाहतूक तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या महत्त्वाच्या जलमार्गावर अमेरिकेचे नियंत्रण असल्याचा दावा करत तो पुन्हा खुला करण्यात आल्याचे सांगितले. दोन्ही देशांच्या परस्परविरोधी दाव्यांमुळे मध्यपूर्वेतील तणाव कायम असून परिस्थितीवर जगाचे लक्ष लागले आहे.