मुंबई
maharashtrachi hasyajatra अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील बहुआयामी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘तुंबाडची मंजुळा’नंतर आता ती ‘बोल बोल राणी’ या आगामी चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सई विविध माध्यमांना मुलाखती देत असून, त्यामध्ये तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याविषयी केलेले वक्तव्य विशेष चर्चेत आले आहे. ‘मुंटा’ला दिलेल्या मुलाखतीत ती याबाबत बोलली.
गेल्या काही वर्षांत सई ताम्हणकरने मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘भक्षक’, ‘मटका किंग’ आणि ‘मिमी’ यांसारख्या प्रकल्पांमध्ये ती झळकली आहे. याशिवाय, ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात परीक्षक म्हणूनही कार्यरत आहे. विविध चित्रपट आणि मालिकांच्या व्यग्र चित्रीकरणाच्या वेळापत्रकातही ती या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहत असल्याचे पाहायला मिळते.‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सुरुवातीपासूनच सई ताम्हणकर या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग आहे. तिच्यासोबत अभिनेता प्रसाद ओकही परीक्षकाच्या भूमिकेत दिसतो. कार्यक्रमातील विनोदी सादरीकरणांवर सई आणि प्रसाद यांच्या प्रतिक्रिया आणि टिप्पणींकडे प्रेक्षकांचे नेहमीच विशेष लक्ष असते. व्यस्त वेळापत्रक असूनही सई या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी नियमित उपस्थित राहते.
या कार्यक्रमातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना सई म्हणाली, “महाराष्ट्राची हास्यजत्रेतल्या त्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह आहे. त्या खुर्चीवर एक-दोन भाग सोडले तर इतर कोणीच बसू शकत नाही, इतकी मी त्यासाठी पझेसिव्ह आहे. एक कलाकार म्हणून माझी प्रतिमा आणि मी माणूस म्हणून कशी आहे, हे त्या खुर्चीवर बसल्यानंतर प्रेक्षकांना कळतं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने मी माणूस म्हणून कशी आहे, हे घरोघरी पोहोचवलं. म्हणून मला ती खुर्ची प्रिय आहे.”
दरम्यान, सई ताम्हणकर सध्या ‘बोल बोल राणी’ या चित्रपटाच्या प्रचारात व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे, सई, सुबोध आणि चिन्मय यांचे त्रिकूट 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सनई चौघडे’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. तब्बल 18 वर्षांनंतर हे तिघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.