वरूड,
murder-of-a-mother : तालुक्यातील बेनोडा पोलिस स्टेशन हद्दीतील सावंगा येथे १ जुलै २०२३ रोजी पोटच्या मुलानेच आईचा धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणातील आरोपी मुलाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ग्राम सावंगा येथील पोलिस पाटील शीला भोजराज आंडे (४०) हीला गावातील सय्यद फारूक यांनी सांगितले की, रजिया बी मस्तान शहा हिला तिचा मुलगा मंजूर शहा मस्तान शहा (४३) याने राहते घरी रात्रीच्या सुमारास मारून टाकले आहे. या माहितीनंतर त्यांनी घटनास्थळ गाठले असता रजिया बी रक्ताचे थारोळ्यात दिसून आली. तिचा मुलगा घरून बेपत्ता होता. मुलाने घरगुती कारणावरून तिला कोण्यातरी शस्त्राने कपाळावर व डोक्यावर मारून जखमी करून जीवे ठार मारले, अशी तक्रार आंडे यांनी पोलिसांत दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला. तपास अधिकारी म्हणून एपीआय स्वप्निल ठाकरे व त्यांच्या चमूने तपास करून आरोपी मंजूर शहा मस्तान शहा यास अटक केली व आरोपीवर गुन्हा सिद्ध होईल असे पुरावे जमा केले. दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटला हा जिल्हा न्यायालय क्रमांक १ व अतिरिक्त सत्र न्यायालय वरूडचे न्यायमूर्ती ए. ए. पंचभाई यांच्या कोर्टात चालविण्यात आला. या गुन्ह्यामध्ये सहाय्यक सरकारी अभियोगता म्हणून जिल्हा प्रशांत देशमुख व मंगेश भागवत यांनी काम पाहिले. बेनोडा ठाण्याचे ठाणेदार विवेक देशमुख व सेशन कोर्ट वरूड येथील हवालदार विवेक हेडाऊ यांनी सर्व साक्षदारांना हजर केले. न्यायमूर्ती यांनी गुन्ह्यातील सर्व साक्षीदार तपासून आरोपीला १५ जुलै रोजी कलम ३०२ मध्ये जन्मठेप व १० हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास चार महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.