नवी दिल्ली,
Sonam Wangchuk's condition is critical शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या जंतर-मंतरवरील उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली असून, त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणादरम्यान त्यांचे सुमारे ८.५ किलो वजन घटल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ही याचिका कार्यकर्ते आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी दाखल केली असून, उपोषण कायम राहिल्यास त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवश्यक निर्देश देऊन सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करावे तसेच गरज पडल्यास त्यांना वैद्यकीय उपचारांसह अन्नपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
याचिकेनुसार, उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. आंदोलनाच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे ८.५ किलो वजन कमी झाले असून रक्तदाब १०७/७० एमएमएचजीपर्यंत घसरला आहे. रक्तातील साखरेची पातळीही ६७ मिलीग्रॅम प्रति डेसिलिटरपर्यंत खाली आल्याचा दावा करण्यात आला आहे. सोनम वांगचुक सध्या उपोषणाच्या १८व्या दिवशी असून, जंतर-मंतर येथे डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. दरम्यान, या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच आंदोलनकर्त्यांनी २० जुलै रोजी संसद भवनावर मोर्चा काढण्याची घोषणाही केली आहे.