गोंदिया,
accident-news : आठवडी बाजारात आलेल्या बापलेकींना भरधाव बोलेरो वाहनाने धडक दिल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे १४ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेहासह ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन छेडले. तब्बल रात्री ३ वाजेपर्यंत सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी आरोपीला २४ तासांत अटक करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बलमाटोला येथील रहिवासी लक्ष्मीचंद सेवईवार हे आपली तीन वर्षीय मुलगी पासी हिला घेऊन मंगळवारी दासगावच्या आठवडी बाजारात आले होते. रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात मालवाहू बोलेरोने त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालक काटी मार्गाने वाहनासह पसार झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पिता-पुत्रीला ग्रामस्थांनी तातडीने दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रावणवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध लागला नसल्याने आणि ठोस आश्वासन मिळाले नसल्याने संतप्त नातेवाईकांनी चिमुरडीचा मृतदेह हातात घेऊन घटनास्थळीच आंदोलन सुरू केले. यावेळी ग्रामस्थांनी 'पोलिस हाय...हाय...'च्या घोषणा देत निषेध व्यक्त केला. दरम्यान, रावणवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार घटनास्थळी पोहोचले. आरोपीला एका दिवसात अटक करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
दोन महिन्यात तीन घटना...
आठवडी बाजाराच्या दिवशी दासगाव मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा केली होती. तसेच रस्त्यावरील गतिरोधक काढून टाकल्यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढल्याचे आरोपही ग्रामस्थांनी केले होते. गेल्या दोन महिन्यांत याच ठिकाणी तीन अपघात घडल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, आरोपी चालकाला तातडीने अटक करावी व बाजाराच्या दिवशी मोठ्या वाहनांवर बंदी घालावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.