पळसगाव वनक्षेत्रात उपप्रौढ वाघाचा मृत्यू

बेशुद्ध करून पकडताना झाला मृत्यू

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
चंद्रपूर,
Sub-adult tiger dies in Palasgaon ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव वनक्षेत्रातील लोकवस्तीच्या परिसरात एका वाघास बेशुद्ध करून जेरबंद केले जात असताना त्याचा मृत्यू झाला. मागील महिन्यात या उपप्रौढ वाघाच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. 28 जून 2026 रोजी चोरगाव परिसरात शिडामे यांच्या मृत्यूस टी 202एफ एस2 हा उपप्रौढ वाघ कारणीभूत ठरला होता. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जलद प्रतिसाद दलाने 4 जुलै 2026 रोजी त्याला बेशुद्ध करून यशस्वीरित्या पकडले होते. त्यानंतर नियमानुसार त्या वाघास ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात सोडण्यात आले होते. 
 
 
 
xedeths
 
 
मात्र, त्यानंतर या वाघाने कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार न करता पुन्हा पळसगाव वनक्षेत्रातील लोकवस्तीच्या परिसरात वावर सुरू केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून संबंधित वाघाच्या हालचालींवर वनविभागामार्फत सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते. मंगळवारी संबंधित वाघास आमिष बांधून पकडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार वाघास बेशुद्ध करण्याची कार्यवाही सुरू असताना दुपारी 3.45 ते 4 या वेळेदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या वाघाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून, त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल, असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) यांनी कळविले आहे.