भंडारा,
Superstition in Gram Panchayat premises तंत्रज्ञानाच्या युगात जगतो, आम्ही स्वतःला पुरोगामी म्हणवतो. चंद्रावर झेपावण्याचे विज्ञान युग आहे याची जाणीव असतानाही अंधश्रद्धेचे सावट अद्याप पूर्णपणे दूर झाले नसल्याचेच साकोली तालुक्यातील झाडगाव येथे घडलेल्या प्रकाराने उघड झाले आहे. ग्रामपंचायतच्या आवारात सकाळी कथित जादूटोणा किंवा भानामतीसदृश प्रकार आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. ग्रामपंचायत परिसरात लिंबू, मिरच्या, हळद, कुंकू, गुलाल आणि अगरबत्त्यांसह संशयास्पद स्वरूपाची पूजा मांडण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धा, भानामती आणि कथित जादूटोण्याच्या घटनांची चर्चा अधूनमधून समोर येत असते. झाडगाव ग्रामपंचायत परिसरात सोमवारी सकाळी उघडकीस आलेला प्रकारही त्यातलाच. यामुळे गावात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतच्या आवारात संशयास्पद स्वरूपाची पूजा करण्यात आल्याचे आढळून आल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
सोमवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता ग्रामपंचायतचे शिपाई संजय लांजेवार हे कार्यालय उघडण्यासाठी गेले असता मुख्य प्रवेशद्वाराच्या आत वर्तुळाकार रचना करून त्यामध्ये षटकोनी आकृती तयार करण्यात आल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी कापलेले लिंबू, मिरच्या, हळद, कुंकू, गुलाल तसेच अगरबत्त्या ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच त्यांनी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि गावातील प्रमुख नागरिकांना तातडीने माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप असतानाही अज्ञात व्यक्ती गेटवरून आत प्रवेश करून हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या प्रकारामागील नेमके कारण किंवा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसून त्याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
या संदर्भात सरपंच भास्कर खंडाईत यांनी सांगितले की, ग्रामपंचायत परिसरात आढळलेल्या या कथित प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे. त्यांनी यापूर्वीही ग्रामपंचायत परिसरातील वृक्षांची तोडफोड, पाईप फोडणे, नळांचे नुकसान, कचराकुंड्या जंगलात फेकणे तसेच सार्वजनिक मालमत्तेची हानी झाल्याच्या घटनांचाही उल्लेख केला. विशेष म्हणजे, याच दिवशी ग्रामपंचायत परिसरात आरोग्य विभागामार्फत लहान मुले, गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी तपासणी व लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. घटनास्थळी आलेल्या काही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने या कार्यक्रमावरही परिणाम झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या हेतूने केला, याचा उलगडा पोलिस तपासानंतरच होणार असून अफवांवर विश्वास न ठेवता सत्य परिस्थिती समोर येण्याची प्रतीक्षा करण्याचे आवाहनही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.