अनिल कांबळे,
नागपूर,
accused-escaped : गुजरातमधील न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटनुसार ओडिशातून अटक करण्यात आलेला एक आरोपी नागपुरातील हॉटेलमधून गुजरात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला. आरोपी पळाल्याचे लक्षात येताच शोधाशोध केल्यानंतर गुजरात पोलिसांनी तहसील पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित दास बकीमदास (वय ४६, रा. दंगरपाडा, कटक, ओडिशा) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. राजकोट शहरातील ‘ए’ डिव्हिजन पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक हिम्मतभाई जिंजाला हे राजकोट येथील न्यायिक प्रथम वर्ग दंडाधिकारी (महानगर) न्यायालयाने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स (एनआय) कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत दाखल धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात जारी केलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी ओडिशाला गेले होते. पीएसआय जिंजाला यांच्यासोबत पोलिस हेड कॉन्स्टेबल जितेंद्रकुमार कालुभाई चव्हाण आणि पोलिस कॉन्स्टेबल प्रदीपभाई आयदानभाई भंगार हेही होते. या पथकाने आरोपीला ओडिशातून अटक करून खासगी टॅक्सीने गुजरातकडे रवाना केले. दरम्यान, १४ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता हे पथक नागपुरातील सीए रोडवरील भावसार चौकाजवळील इंडिया सन्स हॉटेल येथे अल्प विश्रांतीसाठी थांबले.
पीएसआय जिंजाला एका खोलीत थांबले, तर आरोपीला दोन पोलिसांच्या देखरेखीखाली दुसऱ्या खोलीत ठेवण्यात आले. यावेळी एक पोलिस कर्मचारी फ्रेश होण्यासाठी गेला, तर आरोपीवर नजर ठेवणारा दुसरा कर्मचारी झोपल्याचा आरोपीने फायदा घेतला आणि हॉटेलमधून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच गुजरात पोलिसांनी परिसरात आरोपीचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. यानंतर पीएसआय हिम्मतभाई जिंजाला यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २६२ तसेच भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला असून, पुढील तपास तहसील पोलिस करीत आहेत.