गोंदिया,
tigers-carcass-in-the-well : गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील शेतातील विहिरीत वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याप्रकरणी वन विभागाने सदर शेतमालकाला ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोशन लालचंद कटरे (५३) रा. मुरदोली, ता. गोरेगाव, जि. गोंदिया यांच्या शेतातील विहिरीत ११ जुलै रोजी सायंकाळी पद्देदार वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. या घटनेच्या अनुषंगाने वन विभागाने त्यांना आज ता. १५ जुलै रोजी ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणीनंतर सडक अर्जुनी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तसेच वन विभागाकडून वन कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत कलम ९, ३९ व ५१ अन्वये १२ जुलै रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, संबंधित व्यक्तीविरुद्ध २०२४ मध्ये रानगव्याच्या मृत्यूप्रकरणीही वन गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी विद्युत तारेचा शॉक लागून रानगव्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तसेच मृत रानगवा खड्डा खोदून जमिनीत पुरल्याचा आरोप होता. या पार्श्वभूमीवर संशयित म्हणून वन विभागाने त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर. जी. बेहरे, अतिरिक्त कार्यभार, सडक अर्जुनी, हे करीत आहेत.