मंगरूळनाथ शहरात वाहतुकीचा खेळखंडोबा

-नागरिक हैराण -प्रशासन सुस्त

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
मंगरूळनाथ, 
traffic-system-collapsing : शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत असून, मुख्य बाजारपेठेसह प्रमुख चौकांमध्ये वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत आहेत. सकाळी शाळा सुरू होण्याची वेळ, दुपारी बाजारपेठेतील गर्दी आणि सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर अक्षरशः वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 
 

j 
 
 
 
शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहतूक नियोजनाचा पूर्णपणे अभाव असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरच दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जातात. काही ठिकाणी हातगाड्या, चहा व पानटपर्‍यांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून, वाहतूक आणखी संथ होते. परिणामी काही मिनिटांचा प्रवास करण्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.
 
 
 
वाहतूक कोंडीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचणे कठीण होत आहे. रुग्णांना घेऊन जाणार्‍या रुग्णवाहिकाही वाहतुकीत अडकत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. व्यापार्‍यांनाही ग्राहकांच्या गैरसोयीचा फटका बसत असून, शहराच्या प्रतिमेवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वाहतूक नियोजनासाठी पुरेसे पोलिस कर्मचारी रस्त्यावर दिसत नाहीत. काही वेळा वाहतूक नियंत्रणाऐवजी कर्मचारी इतरत्र बसलेले दिसतात. त्यामुळे चौकांमध्ये शिस्त राखणारा कोणी नसल्याने प्रत्येक वाहनचालक आपल्या सोयीनुसार वाहन चालवत असल्याचे चित्र आहे.
 
 
वाहतुकीच्या समस्येला अतिक्रमणाचाही मोठा हातभार लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झालेले बेशिस्त पार्किंग, मालवाहू वाहने मनमानी उभी करणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. त्यामुळे प्रमुख चौकांमध्ये कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नियुक्त करावे, नो-पार्किंग नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियमभंग करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच शहरासाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार करावा. मंगरूळनाथ शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा आजची वाहतूक कोंडी उद्या मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पोलिस विभाग, नगरपरिषद आणि संबंधित प्रशासनाने समन्वय साधून तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.