तभा वृत्तसेवा
मुंबई,
devendra-fadnavis : विदर्भातील एकही जिल्हा यापुढे दुष्काळी राहणार नाही, यासाठी वैनगंगा आणि नळगंगा यांसारख्या मोठ्या योजनांमधून नद्या जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांची वीज मोफत देण्याबरोबरच त्यांची तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिल थकबाकीही पूर्णपणे माफ केली जाणार आहे, अशी ऐतिहासिक घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत केली. भाजपा किसान मोर्चाच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.

विदर्भाला दुष्काळाच्या झळातून कायमचे मुक्त करण्यासाठी शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी पावले उचलली आहेत. याअंतर्गत तब्बल २४ नवी धरणे बांधण्यात येणार असून १६ जुन्या धरणांची उंची वाढवण्याचे काम वेगाने सुरू आहे. वाया जाणारे पावसाचे पाणी अडवून ते गोदावरी आणि तापी खोऱ्यात वळवण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प राबवण्यात येत आहे. याचवर्षी ही कामे पूर्ण करण्यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी वळणबंधाऱ्यांद्वारे मराठवाड्यात नेण्याची आणि उल्हास खोऱ्यातील पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याला देऊन संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्याची मोठी योजना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केल्याबद्दल राज्यभरातून आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी तुतारींच्या निनादात मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांची पाटी कोरी व्हावी आणि त्यांनी प्रगतीचा नवा इतिहास लिहावा, या उदात्त हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कर्जमाफीव्यतिरिक्त शेतकऱ्यांना ९५ हजार कोटी रुपयांचे साहाय्य दिले जात आहे. शेती फायद्याची करण्यासाठी गुंतवणूक वाढवणे गरजेचे असून जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे यांसारख्या योजनांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. सौरपंप आणि सौरकृषीवाहिनी योजनांमुळे सध्या ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून, या वर्षाच्या अखेरीपर्यंत राज्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून दिली जाईल, असा शब्दही त्यांनी दिला.
कोणतीही निवडणूक समोर नसताना सरकारने केवळ शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलने करून दुकानदारी चालवणाऱ्यांना सरकारची ही प्रामाणिक भावना कधीच समजणार नाही, असा सणसणीत टोला त्यांनी विरोधकांना लगावला. आपण स्वतः मातीतले माणूस असून, घरात बसून निर्णय घेणाऱ्यांपैकी नाही. कृषी क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेत जोपर्यंत आमूलाग्र बदल होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना शाश्वत लाभ मिळणार नाहीत. त्यामुळे केवळ स्वप्ने न पाहता ती सत्यात उतरवण्याचा आपला ध्यास असून, राज्यातील नियोजित कामे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राची पुढची पिढी कधीही दुष्काळ पाहणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यांच्या या आक्रमक आणि आश्वासक भाषणाला उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात दाद दिली.
शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज
सौरपंप आणि सौरकृषीवाहिनी योजनांमुळे सध्या ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून, या वर्षाच्या अखेरीपर्यंत राज्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे, शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज मिळणार आहे.