वर्धा,
gajanan maharaj prasad गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील भक्तांकडून २१ ते २८ जुलैपर्यंत लाडू साहित्य समर्पण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून संकलित केलेले लाडू साहित्य हे गजानन भक्तांसाठी शेगाव येथे रवाना करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे हे आठवे वर्ष असून शांतीभवन राधिका रेस्टॉरंटच्या बाजूला एलआयसी कार्यालयासमोर, मेन रोड वर्धा येथे साहित्य संकलित करण्यात येणार आहे. यासाेबतच शहरात अनेक ठिकाणी संकलन केंद्र तयार करण्यात आल्याची माहिती प्रशांत महल्ले यांनी दिली़
गुरुपौर्णिमेनिमित्त श्रींना लाडू साहित्य समर्पण महायज्ञ सोहळा २१ जुलैपासून सुरू होणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक भक्तांनी मागीलवर्षी वर्धेतून ६ लाख रुपयांचे लाडू साहित्य शेगावी अर्पण केले होते.
गेल्या सात वर्षांपासून गुरुपौर्णिमेनिमित्त श्रद्धास्थान असलेल्या गुरुमाऊली गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांना दररोज प्रसाद म्हणून वितरित केल्या जाणार्या बुंदी लाडूसाठी लागणारे साहित्य गुरुदक्षिणा म्हणून समर्पित केल्या जात आहे. शेगाव येथे भक्तांना लाडू प्रसादासाठी दररोज ३५० किलो चणा डाळ, ४०० किलो साखर, २४० किलो तूप आणि आवश्यक त्या प्रमाणात सुका मेवा लागतो. या कार्यात आपलाही हातभार लागावा म्हणून हा उपक्रम आहे. यावर्षी गुरुपौर्णिमा २९ जुलै रोजी येत आहे. त्यामुळे स्वेच्छेने चणा डाळ, साखर, साजूक तूप व सुका मेवा हे चार प्रकारचे साहित्य संकलन केंद्रात अर्पण करायचे आहे. शेगावी रोज वितरित होणार्या लाडू प्रसादात आपलाही खारीचा वाटा असावा, हा उद्देश ठेवून गुरुपौर्णिमा खर्या अर्थाने साजरी करायची आहे. शहरातील प्रतापनगर, पावडे चौक, वंजारी चौक, मगनवाडी, रामनगर, गोंडप्लाट, धंतोली, म्हाडा कॉलनी, गिताईनगर, मुरारका लेआऊट, बँक ऑफ इंडिया कॉलनी, घांगळे लॉन, स्वागत कॉलनी, सहयोगनगर, रेवतकर लेआऊट, स्वामी समर्थ मंदिर आलोडी, स्नेहलनगर म्हसाळा येथे हे संकलन केंद्र तयार करण्यात आल्याची माहिती प्रशांत महल्ले यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.