अमरावती,
youth-brutally-murdered : शहरातील विजय कॉलनी परिसरात बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास २४ वर्षीय तरुणाची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. सहा ते सात अल्पवयीन युवकांनी हल्ला करून प्रथम त्याचा पंजा छाटला. पळत सुटल्यावर त्याला रस्त्यात गाठून चाकूने सपासप वार केले. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अफाक शेख अकिल शेख, रा. ताजनगर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. अफाकचा मित्र मो. याहया अरिब अब्दुल सईद याच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संध्याकाळपर्यंत तिघांना ताब्यात घेतले होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणाच्या संशयावरून काही दिवसांपासून या युवकांमध्ये वाद सुरू होता. एका तरुणीने हा वाद संपुष्टात आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी अफाक व त्याचा मित्र याहया अरिब यांना रुक्मिनी नगरातील विजय काॅलनीतील सॅम्स काॅर्नरवर तिने बोलवले होते. ज्यांच्यासोबत वाद झाला होता, तेही तरुण तेथे आले होते. सुरुवातीला त्यांच्यात चर्चा झाली. दरम्यान, वाद उफाळला आणि दोन युवकांनी चाकू काढून अफाक व मो. याहया यांच्यावर हल्ला चढविला. मो. याहया यातून बचावला पण अफाकवर त्यांनी हल्ला चढवित त्याचा हाताचा पंजाच कापून टाकला. त्यामुळे तो पळत सुटला. मारेकरी युवकांनी त्याला गाठले व शस्त्रांचे वार करून गंभीर जखमी केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोर पसार झाले.
पोलिसांना माहिती मिळताच पथक पोहोचले. ज्या कॅफेसमोर ही घटना घडली, तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटनाक्रम रेकॉर्ड झाला आहे. पोलिसांनी ते फुटेज जप्त करून तपास सुरू केला. संध्याकाळपर्यंत ३ युवकांना ताब्यात घेण्यात आले होते. घटनेचा तपास फ्रेझरपुरा पोलिस करीत आहे.