तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
arun-netke : राष्ट्राच्या उन्नतीसाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच हिंदू संस्कृतीचे जतन, परंपरांचे पालन व उत्सवांच्या माध्यमातून हिंदुत्व जिवंत ठेवण्याची जबाबदारी युवकांनी स्वीकारावी, असे आवाहन मठ-मंदिर अर्चक पुरोहित संपर्क प्रमुख, विश्व हिंदू परिषद केंद्रीय मंत्री अरूण नेटके यांनी केले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त यवतमाळ शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवहुंकार युवा संमेलनात बोलत होते.
रविवार, 12 जुलै रोजी दुपारी 1 वाजता नंदुरकर विद्यालय, यवतमाळ येथे हे भव्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे प्रमुख वक्ते म्हणून अरुण नेटके होते. प्रमुख अतिथी म्हणून सनदी लेखापाल श्रीपाद इंगोले, जिल्हा संघचालक विलास देशमुख, नगर संघचालक धनंजय पाचघरे व जिल्हा कार्यवाह महेश धनरे उपस्थित होते.
या संमेलनात बौद्धिक, शारीरिक, चर्चा व संवाद अशा विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. संघाचे कार्य, कार्यपद्धती व राष्ट्रसेवेचे मूल्य युवकांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आले.
कार्यक्रमात सांघिक गीत शुभम जाधव यांनी सादर केले. संचालन निखिल गाडवे यांनी केले. सुभाषित तरंग दुर्लारवार यांनी सादर केले. तर प्रार्थना अथर्व कठाने यांनी म्हटली. या आयोजनासाठी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. संमेलनात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते, राष्ट्रभावनेचा संदेश या संमेलनातून देण्यात आला.