चंद्रपूर,
heavy rain बल्लारपूर येथे गुरुवारी दूपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे ग्रामीण रुग्णालय परिसरातील सुमारे 100 वर्षे जुने कडुनिंबाचे विशाल झाड अचानक उन्मळून बसवर पडले. या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी दूपारच्या सुमारास महानगरासह जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. बल्लारपूर येथे दूपारी 2 वाजताच्या वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ग्रामीण रुग्णालय परिसरातील सुमारे 100 वर्षे जुने कडुनिंबाचे विशाल झाड अचानक उन्मळून उभ्या असलेल्या टीजी 01 झेड 0041 क्रमांकाच्या आदिलाबाद डेपोच्या बसवर पडले. झाडाच्या मोठ्या फांद्या व खोडाचा भाग बसच्या समोरील काचेवर आदळल्याने काच पूर्णपणे फुटली. झाडाचे लाकूड काच फोडून थेट बसच्या आतील भागात घुसल्याने बसचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे काही काळ मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. झाड रस्त्यावर आडवे पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यानंतर स्थानिक नागरिक व संबंधित यंत्रणांनी झाड हटविण्याचे काम हाती घेतल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालय परिसरात सध्या संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू असून, क्रेनच्या साहाय्याने खोदकाम केले जात आहे. या खोदकामादरम्यान झाडाच्या मुळांना धक्का बसून ती तुटल्यामुळे झाड कमकुवत झाले आणि त्यानंतर जोरदार पावसात ते कोसळले, असा स्थानिक नागरिकांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे. या पावसाने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. मात्र दुबार पेरणीचे संकट अद्याप टळले नसून, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे