अमरावती,
chief-ministers-birthday : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलैला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण अमरावती जिल्ह्यात २५ हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम २२ ते २९ जुलै या कालावधीत जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नवनीत राणा यांनी अमरावती येथील वडाळी रोपवाटिकेला भेट देऊन विविध वृक्षांची पाहणी केली. पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त, दीर्घायुषी व स्थानिक हवामानास पोषक अशा वृक्षांची निवड करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लागवडीनंतर वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन यालाही तितकेच महत्त्व देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या उपक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, गावांची हद्द, नदी-नाले परिसर तसेच मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार असून प्रत्येक कार्यकर्त्याने वृक्ष लावण्याबरोबरच त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना, महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करण्याचा मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास, पायाभूत सुविधा, गुंतवणूक, पर्यावरण संवर्धन आणि जनकल्याणाच्या विविध योजनांना गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, भाजपा शहर उपाध्यक्ष तथा माजी पक्षनेते सुनील काळे, माजी महापौर संजय नरवणे, भाजपा पदाधिकारी सुनील खराटे, कौशिक अग्रवाल आदी उपस्थित होते.