अमरावती,
amravati-university-amrut-sanstha : तरुण उद्योजकांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना बळ देण्यासाठी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती विद्यापीठाच्या ‘एसजीबीएयू रिसर्च ॲन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन’ व महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्था, पुणे यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. यातून नवउद्योजकांचे स्वप्न साकार होणार आहे.
या करारांतर्गत अमृत संस्था आणि इन्क्युबेशन सेंटर यांच्या माध्यमातून इन्क्युबेशन योजना राबवली जाणार असून, याद्वारे राज्यातील १०० नवसंशोधकांची, तर सुरुवातीला एकूण २५ नवसंशोधकांची निवड केली जाईल. निवड झालेल्या प्रत्येक स्टार्टअपला ‘अमृत’ संस्थेकडून एक वर्षासाठी दरमहा २५ हजार रुपये मासिक शिष्यवृत्ती अथवा बीज भांडवल दिले जाईल.
अमरावती विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरतर्फे या तरुणांना अत्याधुनिक प्रयोगशाळा, कार्यशाळा, हक्काची जागा तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन पुरवले जाईल. कृषी तंत्रज्ञान, बायोटेक, ईव्ही आणि आयओटी यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील स्टार्टअप्सना या योजनेमुळे मोठी गती मिळणार असून, पुढील तीन वर्षे हा उपक्रम अविरत राहणार आहे.
हा करार करतेवेळी अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख प्रा. स्वाती शेरेकर, सीईओ आनंद यादव, अमोल हिरुळकर, ‘अमृत’ संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश कथलकर आदी मान्यवर उपस्थित होते.