एपीके फाइल उघडताच खात्यातून १९.७९ लाख लंपास

जमीन विक्रीतून मिळालेली रक्कम उडाली

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
apk file scam एपीके फाइल मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी एका शेतकऱ्याच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवत त्याच्या बँक खात्यातून तब्बल १९ लाख ७९ हजार २३६ रुपये लंपास केले. ही रक्कम शेतजमीन विक्रीतून मिळालेली होती. दिगंबर (५८, रा.मंडा, हिंगणा) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ६ ते १७ जून २०२६ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने ही फसवणूक झाली.
 

apk file scam drains rs 19.79 lakh from nagpur farmer bank account in cyber fraud 
मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर हे शेतकरी असून जोडधंदा म्हणून गवंडी म्हणून काम करतात. १७ जून रोजी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता अज्ञात सायबर गुन्हेगारांनी दिगंबर यांना ‘फाईल ६७४१ एपीके’ नावाची बनावट फाइल मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास प्रवृत्त केले. ही मालवेअरयुक्त फाइल इन्स्टॉल होताच आरोपींनी त्यांच्या मोबाईलवर अनधिकृत नियंत्रण मिळवले. तसेच मोबाईलवर येणारे ओटीपीही आरोपींना मिळू लागले. यानंतर आरोपींनी दिगंबर यांच्या कॅनरा बँक खात्यातून तब्बल १३ अनधिकृत यूपीआय व्यवहार करून १९ लाख ७९ हजार २३६ रुपये काढून घेतले. शेतजमीन विक्रीतून मिळालेली ही रक्कम आरोपींनी विविध बँक खात्यांमध्ये वळती केली. दिगंबर यांच्या तक्रारीवरून नागपूर सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ६१(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६, ६६(क) आणि ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पैसे ज्या खात्यांमध्ये वळते झाले, त्या खात्यांचा आणि डिजिटल व्यवहारांचा माग काढून आरोपींचा शोध घेतला जात आहे.