अटलांटा,
Argentina storms into the final फिफा विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत गतविजेत्या अर्जेंटिनाने अखेरच्या क्षणांत दमदार पुनरागमन करत इंग्लंडचा २-१ असा पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अखेरच्या सात मिनिटांत दोन गोल झळकावत अर्जेंटिनाने पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणला. आता २० जुलै रोजी भारतीय वेळेनुसार मध्यरात्री १२.३० वाजता होणाऱ्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा सामना स्पेनशी होणार आहे. तर इंग्लंडला तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्सविरुद्ध खेळावे लागणार आहे.दोन्ही संघांमधील लढतीची सुरुवात सावध खेळाने झाली. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड या दोन्ही संघांना गोल करण्याच्या काही संधी मिळाल्या, मात्र त्यांचे गोलमध्ये रूपांतर करण्यात दोघांनाही अपयश आले. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.

दुसऱ्या हाफमध्ये इंग्लंडने आक्रमक खेळ करत ५५व्या मिनिटाला आघाडी घेतली. मॉर्गन रॉजर्सच्या अचूक पासवर अँथनी गॉर्डनने चेंडू जाळ्यात धाडत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर इंग्लंडने बचाव अधिक मजबूत केला आणि अर्जेंटिनाचे अनेक प्रयत्न हाणून पाडले.मात्र सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात अर्जेंटिनाने जबरदस्त पुनरागमन केले. ८५व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीच्या पासवर एन्झो फर्नांडिसने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर इंज्युरी टाईमच्या दुसऱ्या मिनिटाला पुन्हा एकदा मेस्सीने अचूक पास दिला आणि लॉटारो मार्टिनेझने शानदार हेडरद्वारे गोल करत अर्जेंटिनाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. इंग्लंडने अखेरपर्यंत बरोबरीसाठी प्रयत्न केले, मात्र अर्जेंटिनाच्या बचावफळीने त्यांना यश मिळू दिले नाही. अंतिम शिट्टी होताच अर्जेंटिनाने २-१ असा विजय मिळवत अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. आता स्पेनविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाकडे सलग दुसरे विश्वचषक विजेतेपद पटकावण्याची संधी असणार आहे.