सिंदी रेल्वे,
atul-shende : सत्य सनातन हिंदुत्वाचे हम सब एक हैं हे मानवतावादी शाश्वत मूल्य पुन्हा एकदा प्रस्थापित करायचे असेल तर वर्ण ही व्यवस्था नसून अवस्था (स्थिती) आहे हे सत्य प्रत्येक भारतीयाने समजून घेतले पाहिजे. ती चातुर्वर्णीय व्यवस्था नसून मनुष्य जीवनाच्या चार अवस्था आहेत. हम सब एक है हे सनातन भारतीय मूल्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कटीबद्ध होण्याचे आवाहन भारतीय विचार मंचाचे प्रांतीय सदस्य अतुल शेंडे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सिंदी शाखेचे केसरीमल शाळेत आयोजित युवा संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
शेंडे पुढे म्हणाले की, सनातन धर्मात ज्ञानाला ब्रह्म म्हणतात म्हणुन ज्ञानार्जन करताना, करवितांना ब्राह्मण व स्वतःचा, परिवाराचा, समाजाचा उदरनिर्वाह करताना करवितांनाचा सर्व व्यवहार प्रपंच म्हणजे वैश्य आणि स्वतःचे, परिवाराचे, राष्ट्राच्या सभ्यता संस्कृतीचे, आपल्या शाश्वत मानवी व नैतिक मूल्यांचे संरक्षण करताना क्षत्रिय तसेच परिवारात, समाजात देशात कधीही कुठेही कोणीही अभावग्रस्त असक्षम असताना आपल्या दुखित पीडित बांधवांची सेवाभावी मदत करताना, सुशुषा करताना शूद्र. मुळात ईथे मूळ शब्द सुशुत असा असावा असे वाटते. आणि इतक्या उत्तम उदात्त उन्नत मानवी मूल्य जपणार्या, जगणार्या, पिढी दर पिढी रुजविणार्या सनातन सभ्यतेला विचारधारेला वर्ण विभागणीच्या नावाखाली जातीभेदाचे षड्यंत्रकारी रुप देऊन हिंदू, हिंदुत्व आणि स्व निर्मित (जन्मजात) हिंदुराष्ट्राचे खच्चीकरण सुरु आहे. पण, आता हे फुटीरतावादी षड्यंत्र समूळ नष्ट होणार आणि आपण सगळे एक आहोत हे वास्तववादी मूल्य पुन्हा प्रस्थापित होणार. यासाठी युवकांनी जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन शेंडे यांनी केले.
कार्यक्रमात जिल्हा शारीरिक प्रमुख आशिष पामरे यांनी शाळेच्या प्रांगणात संघाची शाखा लावून युवकांना एक तासाच्या शाखेचे पूर्ण प्रात्यक्षिक दिले. यावेळी वर्धा नागरी बँकेचे संचालक राजेश लोंढेकर, शिक्षक, स्थानिक व्यावसायिक व निमंत्रित उपस्थित होते.