डिझेल-एटीएफवर केंद्राचा कराचा बूस्टर

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Centre's tax booster for diesel and ATF आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्याने केंद्र सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) यांच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पेट्रोलच्या निर्यातीवरील करात कपात करण्यात आली असून, अर्थ मंत्रालयाने जारी केलेले नवे दर १६ जुलैपासून लागू झाले आहेत.सरकारच्या नव्या निर्णयानुसार, डिझेलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर ₹८.५ वरून ₹१५.५ करण्यात आले आहे. एटीएफवरील कर प्रति लिटर ₹७.५ वरून ₹१४.५ करण्यात आला आहे. दुसरीकडे, पेट्रोलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर ₹४ वरून ₹२.५ इतके कमी करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, तसेच तेल कंपन्यांच्या नफ्याचा विचार करून केंद्र सरकार वेळोवेळी विंडफॉल टॅक्सचा आढावा घेत असते. त्यानुसार यावेळी नव्या दरांची घोषणा करण्यात आली आहे.
 
 

सझ ४ ६  
 
 
जुलै महिन्यात ब्रेंट क्रूडच्या किमतींमध्ये सुमारे १७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. याआधी एप्रिल, मे आणि जून महिन्यात तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण झाली होती. दरम्यान, ब्रेंट क्रूडचा दर सुमारे २ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ८४.७३ डॉलर इतका झाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक तेलपुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या धोक्यामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर दबाव वाढल्याचे मानले जात आहे. याआधी १ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलदर घसरल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी एटीएफच्या किमती प्रति लिटर सुमारे ₹५ ने कमी केल्या होत्या. मात्र, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाल्याने केंद्र सरकारने विंडफॉल टॅक्समध्ये सुधारणा करत डिझेल आणि एटीएफवरील निर्यात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.